शाळेत शिष्यवृत्ती घोटाळा?
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : जिल्हा परिषदेच्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये घोळ झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा न करता खोटे अंगठे घेऊन वाटप केल्याचा खळबळजनक दावा पालकांनी केला आहे. याबाबत संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारीऱ्यांना लिखित तक्रार दिली आहे. तर पालकांनी आम्ही दरवेळी सह्या करत असून हे रजिस्टरवरील अंगठे आमचे नाहीत, असे म्हणत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई या जिल्हा परिषद शाळेत वंदना वाघे, अर्जुन वाघे, दिशा वाघे, दुर्गा सवार यांच्यासह आणखी १० ते १२ आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटल्याचे उघडकीस आले आहे. दरवर्षी सरकारकडून मिळणारी सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून मिळालीच नसल्याने पालकांनी शाळेत चौकशी केली. त्यावेळी जुन्या शिक्षकांची बदली झाली असून, त्यांच्या काळात या विद्यार्थ्यांना रोख देण्यात आल्याची आणि तसे पालकांचे अंगठे घेतल्याचे रजिस्टरवर दाखवण्यात आले. मात्र, पालकांनी अशी कोणतीही रक्कम आम्हाला मिळाली नाही. आम्ही नेहमी सह्या करतो. कोणत्याही रजिस्टरवर अंगठे दिले नसल्याचे सांगितले. या धक्कादायक प्रकारामुळे पालक व विद्यार्थी संतप्त असून, शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती रोख न देता बँक खात्यात जमा करण्याचा सरकारचा नियम असताना खोटे अंगठे घेऊन ती वाटप झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
मनविसेचे निवेदन
मनसेच्या वतीनेही मनविसेचे जयेश केवणे यांनी या प्रकरणात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शाळेची व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शाळेच्या अकाउंटपर्यंत सरकारकडून निधी वर्ग झालेला आहे का, याची तपासणी करावी. जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दिली जाते. जावसई शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने शाळेतून माहिती मागवून रेकॉर्ड तपासणीसाठी घेतला आहेत. ही शिष्यवृत्ती नियमानुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित असते. मात्र, बँक खाते बंद असल्याने अथवा इतर तांत्रिक कारणास्तव हे पैसे परत गेल्याची माहिती देण्यात आली. शिष्यवृत्ती रोख स्वरूपात मुलांना वाटप केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची आणि पालकांचे खोटे अंगठे घेतल्याची तक्रार आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- विशाल पोतकर, गटशिक्षणाधिकारी अंबरनाथ
अंबरनाथ : शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.