सात जोडप्यांच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी
सात जोडप्यांच्या पुन्हा जुळल्या रेशीमगाठी
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) ः एकमेकांपासून कायमचे वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या सात दांपत्यांना पुन्हा एकत्र आणण्याची महत्वाची भूमिका कौटुंबिक न्यायालयाने पार पाडली आहे. सामंजस्याने आपसात तडजोड करून न्यायालयातील प्रलंबीत आणि दाखल पूर्वदावे निकाली काढण्यासाठी विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोक अदालत भरावण्यात आली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील बेलापूर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट घेण्यासाठी दावा दाखल केलेल्या सात दांपत्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि बेलापूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सी.व्ही. मराठे, विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. रविंद्र पाजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर जिल्ह्यात शनिवारी (ता.१३) राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. यामध्ये बेलापूर कौटुंबिक न्यायालयात घटसफोट घेण्यासाठी दावा दाखल केलेल्या दांपत्यांमध्ये आपसात तडजोडीतून समेट घडवून आणून हे दावे निकाली काढण्यासाठी लोक अदालत पार पडली. त्यात ९८ दांपत्यांनी आपसातील दावे निकाली काढण्यासाठी भाग घेतला होता.
नवी मुंबई कोर्ट वकील संघाचे अध्यक्ष सुनिल मोकल, उपाध्यक्ष संदिप रामकर, सचिव विकास म्हात्रे, खजिनदार तुषार राऊत, सहसचिव संजय म्हात्रे व हेमांगी पाटील आणि कार्यकारिणी सदस्य समीत राऊत, दत्तात्रय जगताप, अजिंक्य गव्हाणे, निलेश पाटील आणि डिंपल चांद्रा यांनी सहकार्य केले. तसेच कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक गणेश हिरवे, विवाह समुपदेशक भारत काळे, लघुलेखक विजय पोटे, सहा अधिक्षक राजेश म्हात्रे, वरिष्ठ लिपीक कांचन किर्वे, कनिष्ठ लिपीक श्रेया म्हात्रे, अक्षता कोळसुंदकर आणि सहाय्यक प्रिती नन्नावरे व राज निकम उपस्थित होते.
नांदा सौख्यभरेचे प्रमाणपत्र
दांपत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. ए. साने, विधीज्ञ वकिल संघटनेच्या डिंपल चांद्रा यांचे पॅनेल बसले होते. यावेळी आपसात समेट घडवून पुन्हा एकत्र आलेल्या दांपत्यांचा नवी मुंबई कोर्ट वकिल संघटना यांच्यातर्फे नांदा सौख्यभरेचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.