सहज, सोपी व सुलभ पनवेल महापालिका

सहज, सोपी व सुलभ पनवेल महापालिका

Published on

‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल
महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर
पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : महापालिकेने नागरिकांसाठीच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक, सुलभ करण्यासाठी ‘किओस्क’ पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे महत्त्वाची कागदपत्रे, कर भरणा, तक्रारी नोंदविणे आणि विविध सेवांचा लाभ क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने पालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याला पूर्णविराम लागणार आहे.
पनवेल पालिकेच्या हद्दीतील नागरिकांना विविध अर्ज, तक्रारी, कर भरणा, जन्म-मृत्यू दाखले, मालमत्ता कर भरणा करण्यासाठी पालिका मुख्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. या सेवा त्वरित मिळाव्यात, यासाठी किओस्क यंत्रणा महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता येणार आहे. पनवेल महापालिकेचा हा निर्णय ‘डिजिटल पनवेल’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
--------------------------------------
सर्व सुविधा एकाच ठिकाणी
मालमत्ता कर, पाणीपट्टी भरणे, जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज, परवानग्या, नकाशे यांची माहिती, तक्रारी, सूचना नोंदविण्याची सोय, विविध विभागांची ऑनलाइन माहिती अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून सेवांचा वेग वाढेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
----------------------------------
‘किओस्क’ म्हणजे काय?
किओस्क टच स्क्रीनवर आधारित संगणक यंत्रणा असून नागरिक स्वतःच त्याद्वारे आवश्यक सेवा घेऊ शकतात. मालमत्ता कर, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज करणे, परवानग्या व नकाशे याबाबत माहिती घेणे, तक्रारी नोंदविणे, तसेच विविध विभागांची ऑनलाइन माहिती मिळविणे, अशा सेवा यंत्रणेद्वारे उपलब्ध होणार आहेत.
-------------------------------------
पनवेल महापालिकेचा उद्देश नागरिकांना सहज, सोप्या आणि सुलभ पद्धतीने सेवा उपलब्ध करून देणे आहे. किओस्क प्रणालीद्वारे नागरिकांचा वेळ वाचेल, पालिकेच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल. हा उपक्रम ‘डिजिटल पनवेल’साठीचे महत्त्वाचे पाऊल आहे.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

Marathi News Esakal
www.esakal.com