पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात हत्तीरोग रुग्णशोध मोहिम सुरू

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात हत्तीरोग रुग्णशोध मोहिम सुरू

Published on

हत्तीरोगाविरोधात पालिकेचा लढा
पनवेल परिसरातील रुग्णशोध मोहिमेला सुरुवात
पनवेल, ता. १४ (बातमीदार)ः हत्तीरोग निर्मूलनासाठी शासनाच्या सूचनांनुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात हत्तीरोग रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार कार्यक्षेत्रातील २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अतिजोखमीची ठिकाणे निश्चित केली आहेत.
झोपडपट्ट्या, स्थलांतरितांची वसाहत, तसेच ज्या भागांत हत्तीरोग रुग्णांची संख्या अधिक आहे, अशा भागांत प्राधान्याने ही मोहीम सुरू आहे. याबाबतची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. या मोहिमेत संशयित रुग्णांचे रक्त नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे. दिवसा रुग्णशोध मोहीम राबविली जात असून, रात्री रक्त नमुने संकलनाचे काम सर्वेक्षण पथक, बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष, आरोग्यसेवकांकडून केले जात आहे. या मोहिमेमुळे हत्तीरोगावर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
़़़़़़ः------------------------------------
नागरिकांना आवाहन
घराभोवती गटारांमध्ये पाणी साचू देऊ नका, तुंबलेली गटारे वाहती करा, खड्ड्यांमध्ये आठवड्यातून एकदा रॉकेल/खराब तेल टाकावे, शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी बसवावी, अंग झाकणारे कपडे घालावेत; झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा, फुटके डबे, टायर्स, नारळाच्या करवंट्या यांची योग्य विल्हेवाट लावा.

Marathi News Esakal
www.esakal.com