आदिवासी विद्यार्थ्यांची शाळेकडे नव्याने ओढ
बदलापूर : लव्हाळी शाळेचे रुपडे पालटल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे.
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १४ : चांगल्या हेतूने केलेले कार्य अधिक चांगले फळ देते, याचा प्रत्यय मुरबाड तालुक्यातील लव्हाळी या छोट्याशा आदिवासी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला आला आहे. जीर्ण, मोडकळीस आलेल्या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची शाळेकडे ओढ कमी झाली होती. मात्र, बदलापूर शहरातील लक्ष्य फाउंडेशनच्या पुढाकारातून व सिनेक्रॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर फंडातून या शाळेचे संपूर्ण नूतनीकरण करून तिला नवीन झळाळी देण्यात आली.
बदलापूरपासून बारवी धरण रोड परिसरात मुरबाड तालुक्यातील साधारण १५ ते २० किमी अंतरावरील लव्हाळी हे संपूर्ण आदिवासी वस्तीचे छोटे गाव आहे. गावात एकंदरीत २० ते २५ घरे आहेत. या गावातील पहिली ते पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र, या शाळेची अत्यंत गंभीर अवस्था झाली होती. इमारत मोडकळीस, तर भिंतींना तडे गेले होते. इमारतीच्या अंगणात गुरे चरत होती. शाळेभोवती संरक्षक भिंती नव्हत्या. शौचालयांची अवस्था तर अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त झाली होती. अशा वातावरणात गावातील एकूण २५ विद्यार्थी शिक्षण घेत होते.
बदलापुरातील लक्ष्य फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष पाटील यांनी सदस्यांसह शाळेला भेट दिली. शाळेचे रूपडे पालटण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील प्रसिद्ध सिनेक्रॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आता भिंती दुरुस्त करून शालेय थीमवर सजवण्यात आल्या असून सुविचार, गणिती तक्ते, शैक्षणिक म्हणी रेखाटण्यात आल्या आहेत. शाळेला संरक्षक भिंत, स्वच्छ शौचालये, बसण्याची व्यवस्था, पटांगणातील झाडे, परसबाग, पिण्याचे पाणी यांसह सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
आधुनिक झळाली
शाळेचे नूतनीकरण झाल्याने आता विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली असून मुलांना घरापेक्षा जास्त शाळेची ओढ लागली आहे. शाळेत आधुनिक शिक्षणपद्धती अर्थात ई लर्निंग पद्धत आणून संगणक, स्मार्ट टीव्ही देण्यात आले. शाळेच्या पटांगणात झोके आणि इतर खेळणी बसवून दिली. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, छतावर सोलर पॅनल व्यवस्था करून दिली आहे. या परिवर्तनामुळे परिसरातील इतर शाळा लव्हाळी शाळेचा आदर्श घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्योतिबा वाचन कट्टा चर्चेचा विषय
लव्हाळी येथील शाळेचे रूपडे पालटताना ज्योतिबा वाचन कट्टा तयार करण्यात आला. या माध्यमातून या ठिकाणी पुस्तकांनी भरलेले कपाट ठेवले आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाचनाची ओढ लागावी यासाठी ज्योतिबा वाचन कट्टा तयार केला आहे. यामुळे अनेक तरुण आणि प्रौढ नागरिक वाचन कट्ट्यावर पुस्तके वाचत असतात.
लव्हाळी येथील शाळेचे रुपडे पालटण्यासाठी पुण्यातील सिनेक्रॉन कंपनी, ग्रामस्थ, शिक्षकांचे विशेष सहकार्य मिळाले. शाळेत राबविलेल्या सुविधा फाउंडेशनने दिल्या आहेत. शाळेच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे लक्ष देऊन सामाजिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
- शिरीष पाटील, अध्यक्ष,
लक्ष्य फाउंडेशन, बदलापूर
उन्हाळी सुट्टी पडण्यापूर्वीची आणि आत्ताची शाळा यात मोठे अंतर आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेची डागडुजी केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटत आहे. नव्या वर्षात विद्यार्थ्यांनी एक वेगळी ऊर्जा घेत प्रवास सुरू केला आहे. नवीन शाळा बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद आम्हा गावकऱ्यांसाठी मोठा आहे.
- लता बांगारा, अध्यक्ष,
शाळा व्यवस्थापन समिती, लव्हाळी
आम्ही शिकलो नाही कारण आम्हाला शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी कोणी पुढाकार घेतलाच नाही. मात्र, आमची मुले-बाळ शिकून मोठी व्हावीत, हे स्वप्न आहे. जूनमध्ये शाळा उघडल्यानंतर शाळेचा कायापालट झालेले पाहून मुले घरी थांबायला मागत नाहीत. एकही दिवस दांडी न मारता शाळेत येण्यासाठी ते आनंदाने येतात.
- रवीना बांगारा, आदिवासी पालक, ग्रामस्थ लव्हाळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.