भिवंडीत लाखो रुपयांची वीज चोरी

भिवंडीत लाखो रुपयांची वीज चोरी
Published on

भिवंडीत लाखो रुपयांची वीजचोरी
चार आरोपींविरुद्ध गुन्हा

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : टोरेंट पॉवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांच्या वीजचोरीचे प्रमाण उघडकीस आणले आहे. थेट वीजजोडणी घेत चोरी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या कारवाईनंतरही शहरात वीजचोरीचा प्रश्न कमी होत नाही.

शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वीजचोरीची दोन स्वतंत्र प्रकरणे उघडकीस आली आहेत. टोरेंट पॉवर कंपनीच्या छाप्यांमध्ये आरोपींनी बेकायदेशीर थेट कनेक्शन घेतले असून, मोठ्या प्रमाणात वीजचोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे कंपनीला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कंपनीचे कार्यकारी शंकर गणपती सवर्तकर यांनी सज्जाद अहमद नासिर अन्सारी आणि आलम यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. आरोपी कोणत्याही वैध कनेक्शनशिवाय बेकायदेशीर तारा जोडून वीज वापरत होते. तपासात समोर आले की, त्यांनी बराच काळ वीजवाहिनीवरून थेट कनेक्शन घेऊन परिसरात दिवे आणि उपकरणे चालवली. या प्रकरणात कंपनीचे अंदाजे एक लाख ४२ हजार ९६५ रुपये इतके नुकसान झाले आहे.

योगेश दिलीप काळे (व्यवस्थापक) यांनी तक्रार केली की, आरोपी बद्रे आलम अन्सारी आणि सद्दाम यांनी टोरेंट पॉवर कंपनीच्या टॅपेटमध्ये छेडछाड करून थेट वायर जोडून वीजचोरी केली आहे. या प्रकरणात कंपनीचे सुमारे १५ हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३८, आयपीसी कलम ३२४, आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कठोर कारवाईचा इशारा
भिवंडी परिसरात वीजचोरी ही गंभीर समस्या बनली असून, यामुळे विभागाला कोट्यवधींचे नुकसान होते तसेच प्रामाणिक ग्राहकांवर अतिरिक्त भार पडतो. आगामी काळात अशा बेकायदा वीजजोडणीबाबत कठोर आणि अधिक व्यापक कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com