ठाण्यात भरली फुलपाखरांची जत्रा

ठाण्यात भरली फुलपाखरांची जत्रा

Published on

ठाण्यात भरली फुलपाखरांची जत्रा
बटरफ्लाय गार्डनमध्ये आढळली ३६ प्रजातींची फुलपाखरे

ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) : एकीकडे सण, उत्सवांमुळे आनंदाला उधाण आले आहे, तर दुसरीकडे फुलांवर भ्रमण करणाऱ्या विविध रंगांची फुलपाखरे बागडण्याचा महिना सुरू झाल्याने फुलपाखरूप्रेमींच्याही आनंदाचे दिवस आले आहेत. त्यामुळे रानावनात बहरलेल्या फुलांवर लक्ष वेधून घेणारी फुलपाखरे दिसू लागली आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बटरफ्लाय गार्डनमध्ये दोन दिवसांत ३६ प्रजातींची फुलपाखरे आढळून आली आहेत. फुलपाखरूप्रेमींनी शनिवार आणि रविवारी निसर्गप्रेमी नागरिकांना सोबत घेऊन बटरफ्लाय वॉक केला होता.

सजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिक्षेत्रात ठाणे महापालिकेने बटरफ्लाय गार्डन बांधले आहे. या उद्यानात फुलपाखरांना फुलांमधून भरपूर खाद्य मिळेल, या अधिवासात त्यांना मनसोक्तपणे बागडता येईल, रानावनात उमलणारी नैसर्गिक फुलांमध्ये वास्तव्य करता येईल आणि त्यांच्या जन्मापासून उडण्याचा हालचाली टिपता येतील, अशी व्यवस्था येथे निर्माण केली आहे. पावसाचे सुरुवातीचे दोन तीन महिने सरताच हे उद्यान फुले आणि फुलपाखरांनी बहरून जाते. सप्टेंबर महिना फुलपाखरू महिना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक वर्षी फुलपाखरांचा अभ्यास करणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक रानावनात फुलपाखरांचे निरीक्षण करायला निघतात.

ठाण्यातील ओवळेकर बटरफ्लाय गार्डनमध्ये ठाणे ग्रीन कलेक्टिव्हने सेव्ह कवेसर लेक सिटीझन्स ग्रुप आणि सोल बर्डर्स ग्रुपच्या सहकार्याने आयोजित केलेल्या बटरफ्लाय वॉकमध्ये सुमारे ६६ नागरिकांनी भाग घेऊन फुलपाखरांचे निरीक्षण केले. त्यात त्यांना ३६ प्रजातींची फुलपाखरे आढळून आली. या वॉकमध्ये निशांत बंगेरा, बटरफ्लाय गार्डनचे संस्थापक राजेंद्र ओवळेकर, सेव्ह कवेसर लेक सिटीझन्स ग्रुपच्या क्लारा कोरिया यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

आढळून आलेली मुख्य फुलपाखरे
ब्लू मॉर्मन, क्रिमसन रोझ, पाम फ्लाय, कॉमन बॅरन, ग्रेट ऑरेंज टिप, सह्याद्री ब्लू ओकलीफ

फुलपाखरांचे कूळ
निल कूळ, पिवळं, कुंचलपाद, चपळ, मुग्धपंखी, स्वालो टेल

बटरफ्लाय महिना
सप्टेंबर महिना बटरफ्लाय मंथ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात निसर्ग विविध फुलांनी भरलेला असतो. सूर्यप्रकाश पडत असल्याने वातावरणात काहीशी उष्णता येते. शीत रक्त गटात येणाऱ्या फुलपाखरांसाठी हा काळ महत्त्वाचा असतो. त्यामुळे या महिन्याची फुलपाखरूप्रेमी वाट पाहात असतात.

फुलपाखरू हा परागवहन कीटक आहे. निसर्ग रक्षणात त्याचाही सहभाग आहे. त्यामुळे लोकांनी त्याचे रक्षण करायला हवे. आपण राहात असलेल्या ठिकाणी फुलांची झाडे लावायला हवीत.
प्रा. क्लारा कोरिया, फुलपाखरू अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com