अकरा गावांना सुरक्षाकवच
११ गावांना सुरक्षाकवच
किनाऱ्यावरील बंधाऱ्यांसाठी जिल्ह्याला ७० कोटींचा निधी
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १४ ः जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावांमधील शेकडो घरांचे समुद्रातील उधाणाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होते. काही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था आहे. याच अनुषंगाने राज्य शासनाने पालघर, वसई आणि डहाणू तालुक्यांमधील ११ गावांमध्ये धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
समुद्राची भरती वाढल्यामुळे किनाऱ्यांवरील घरांसह सुरूच्या बागांचे मोठे नुकसान होत आहे. किनाऱ्याची वाढलेली धूप भविष्यात विविध संकटांना निमित्त ठरणार आहे. याच अनुषंगाने तीन तालुक्यांच्या ११ गावांसाठी धूप प्रतिबंधक बंधारे मंजूर झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या भागीदारी निधीतून हे बंधारे उभारले जाणार आहेत. किनारपट्टीच्या गावांना संरक्षण देण्यासाठी व किनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी आपत्ती, मदत व पुनर्वसन खात्याने बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे.
-----------------------------------------
केंद्र, राज्याचा संयुक्त प्रकल्प
पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील तीन, पालघर तालुक्यातील दोन, तर डहाणू तालुक्यातील पाच गावांच्या किनारपट्टी भागात बंधारे कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत उभारले जाणार आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १९ डिसेंबर २०२३ रोजी या कामाला मंजुरी दिलेली आहे. त्यासाठीचा ७५ टक्के निधी केंद्र, तर राज्य शासन २५ टक्के निधी देणार आहे.
-------------------------------------
भौगोलिक परिस्थितीनुसार उभारणी
बंधाऱ्यांची कामे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केली आहे. समुद्रकिनारी बांधण्यात येणारे बंधारे तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार उभारले जाणार आहेत. काही ठिकाणी दगडांचे बंधारे, तर काही ठिकाणी भराव, इतर पद्धतीचे तंत्रज्ञान अवलंबून बंधारे उभारले जाणार असल्याचेही महामंडळाच्या तांत्रिक विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
---------------------------
किनारे भकास
भरतीमुळे समुद्राच्या मोठ्या उधाणाच्या पाण्याची पातळी, परीघ दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे वसई, डहाणू आणि पालघर तालुक्याच्या किनारपट्टी भागातील शेकडो घरांचे पाणी जाऊन नुकसान होते. किनारी भागातील सुरूच्या बागा उन्मळून किनारे भकास होत आहेत.
-------------------------------
तालुका गाव खर्च
वसई नगाव नऊ कोटी ३६ लाख
डहाणू आगर, नरपड आठ कोटी ५३ लाख
इतर गावे - सहा ते आठ कोटी