थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड
Published on

मुरूडमधील शेतकऱ्यांना बांबू वृक्षांचे वाटप
मुरुड (बातमीदार) : शेतकऱ्यांना नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी व शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ‘अटल बांबू समृद्धी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी झालेल्या मुरुड-जंजिरा परिसरातील शेतकऱ्यांना नुकतीच बांबूच्या रोपांची वाटप प्रक्रिया पार पडली. मुरूड शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सचिव दिनेश मिनमिने यांच्या हस्ते शेतकऱ्यांना रोपे देण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी कंपनीचे संचालक निखिल मानजी, पुष्कर भोईर, गणेश गाणार, मुश्शरीफ खतीब, अनिल नाक्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शेतकरी लाभार्थ्यांमध्ये मोहन पाटील, शाबाज उलडे, दिलावर सौदागर, समित दळवी, महेश जोशी, मनोज रणदिवे, दामोदर थळे, दाऊद हसवारे, दामोदर रिकामे आदी उपस्थित होते. सचिव मिनमिने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बांबू लागवड ही आजच्या काळाची गरज असून त्यातून रोजगारनिर्मितीबरोबरच पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी उत्साहाने रोपे स्विकारली आणि पुढील काळात अधिक प्रमाणात बांबू लागवड करण्याचा संकल्प व्यक्त केला. या वाटपामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून बांबू शेतीमुळे रोजगारवाढीबरोबरच शेतीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
....................
चिंचवलीवाडी येथे अजगराला जीवदान
माणगाव, ता. १४ (वार्ताहर) : पावसाळ्यात सरपटणारे प्राणी अन्नाच्या शोधात गाववस्तीकडे येतात. अशाच घटनेत गोरेगावजवळील चिंचवलीवाडी नवेनगर येथे जुन्या अंगणवाडीच्या परिसरात तब्बल १२ ते १३ फुटांचा अजगर आढळून आला. हा अजगर बेडकांच्या शोधात त्या परिसरात शिरला होता. गावातील तरुणांनी तत्काळ स्थानिक सर्पमित्र जिज्ञेश दोषी यांना संपर्क केला. दोषी यांनी दिग्विजय गावनेर, केदार पाटील व सुशांत कांबळे यांच्या मदतीने शिताफीने शोधमोहीम राबवली. मोठ्या प्रयत्नांनंतर अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्‍यानंतर नियमांचे पालन करून तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनरक्षक विशाल कदम, अनिल मोरे, वैभव कांबळे व दुर्गेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. चौकशी पूर्ण करून त्यांनी जिज्ञेश दोषी आणि त्यांच्या टीमच्या मदतीने अजगराला पुन्हा सुरक्षित अधिवासात सोडून दिले.
...............
पेझारीतील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सानिका घरत प्रथम
पोयनाड, ता. १४ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे झेप फाउंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सानिका घरत हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला १५ हजार रुपयांचा रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक अमोल गोळे, तृतीय क्रमांक लक्ष्मण कचरे यांनी मिळवला. तर श्रावण कदम व शैलेश कोंडसकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले. एकूण ३० स्पर्धकांनी कृषी संस्कृतीची दशा-दिशा, पर्यावरण संवर्धन, सायबर क्राईम, कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिकरण आणि महिलांचे सबलीकरण अशा विषयांवर आपली मते मांडली. या वेळी खासदार सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जे. एम. म्हात्रे, पंडित पाटील, महेश मोहिते, आस्वाद पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार केला. झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्व कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
.............
खोपोलीत रंगला नारी वैभव भारत दर्शन सोहळा
खोपोली, ता. १४ (बातमीदार) : आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नारी वैभव – भारत दर्शन’ हा भव्य सोहळा शहरातील महाराजा सभागृहात दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात महिलांनी भारताच्या विविध राज्यांचे पारंपरिक परिधान, नृत्यकला, संस्कृती आणि वैशिष्ट्ये सादर केली. ‘विविधतेत एकता’ हा भारताचा आत्मा या सोहळ्यातून खुला झाला. कार्यक्रमास आमदार महेंद्र थोरवे, मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, शहरप्रमुख संदीप पाटील, ज्येष्ठ नेते मोहन औसरमल यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. सहभागी महिलांनी सादर केलेल्या कला, फॅशन शो आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. सहभागींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व अभिनंदनपत्रे देऊन करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ मिळालेच, शिवाय भारतीय संस्कृतीतील विविधतेबद्दल समाजामध्ये जागृती झाली. स्थानिक नागरिकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com