श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

Published on

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन
पावसाळी उधाणाकडे दुर्लक्ष; जीव धोक्यात घालणारे प्रकार वाढले
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : महिन्याच्या दुसऱ्या शनिवार-रविवारला सलग दोन दिवस सुट्टी मिळाल्याने श्रीवर्धनमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. श्रीवर्धनचे प्रमुख आकर्षण असलेल्या तब्बल अडीच किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी हजेरी लावली असली तरी पावसाळ्यात समुद्राला आलेल्या उधाणाचा धोका पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचे चित्र समोर आले आहे.
जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटन व्यवसायात काहीसा खंड पडला होता. हॉटेल, लॉज, होम-स्टे, रिक्षाचालक तसेच समुद्रकिनाऱ्यावर चालणारे छोटे व्यवसाय यांवर याचा थेट परिणाम झाला होता. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते, मात्र दोन दिवसांच्या सुट्टीमुळे पुन्हा पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यवसायिकांना दिलासा मिळाला. तरीही पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिक प्रशासन व पोलिस यांची चिंता वाढली आहे.
श्रीवर्धन नगर परिषद व स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनाऱ्यावर लाल झेंडे, सूचना फलक आणि इशारे लावले आहेत. पावसाळ्यात समुद्राच्या पाण्यात उतरू नका, उधाणामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, शिवाय किनाऱ्यावर नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना थेट सूचना दिल्या जात आहेत. तरीदेखील अनेक जण या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समुद्रात पोहण्यासाठी उतरतात.
.................
मद्यपान करून पर्यटकांचा उच्‍छाद
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही पर्यटक समुद्रात उतरतात. काही जण मद्यपान करून पाण्यात जातात, जे अत्यंत धोकादायक आहे. प्रत्येक वर्षी अशा प्रकारामुळे दुर्घटना घडते; तरी पर्यटक याला गांभीर्याने घेत नाहीत. यंदा पावसाळ्यात समुद्रात उधाण जास्त असून, पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने आत ओढून नेतो. बचाव पथकाच्या अनुपस्थितीत कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास तातडीने मदत करणे कठीण होते. पर्यटकांच्या निष्काळजीमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.
.....................
अतिरिक्‍त कर्मचारी तैनात
नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुट्टीच्या काळात अतिरिक्त कर्मचारी किनाऱ्यावर तैनात केले जातील. तसेच पोलिसांच्या मदतीने नियमभंग करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे. एकंदरीत, पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असली तरी पर्यटकांनीच नियमांचे पालन न केल्याने त्यांचे प्राण धोक्यात येत आहेत. सुरक्षित पर्यटनासाठी प्रशासनाबरोबरच पर्यटकांनीही जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com