जसखार, सोनारीसाठी नवा उड्डाणपूल
जसखार, सोनारीसाठी नवा उड्डाणपूल
अपघातांच्या पार्श्वभूमीवर जेएनपीए प्रशासनाचा निर्णय
उरण, ता. १५ (वार्ताहर)ः जसखार, सोनारी, करळ-सावरखार गावांना जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलासाठी जेएनपीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघातांना आळा बसेल, अशी माहिती जेएनपीएचे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी दिली.
जेएनपीए बंदरामुळे विस्थापित झालेल्या चार गावांतील नागरिकांना दोन राष्ट्रीय महामार्गामुळे अंतर्गत प्रवासासाठी वळसा घ्यावा लागतो. दीड ते दोन किलोमीटरच्या अतिरिक्त प्रवासामुळे वेळ, पैसा वाया जातो. तसेच अनेक वर्षांपासून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
यामुळे जेएनपीएचे ट्रस्टी दिनेश पाटील यांनी जेएनपीए प्रशासनाकडे चारही गावांना जोडणारा सुरक्षित मार्ग उभारण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने नव्या उड्डाणपुलाच्या निविदेला मंजुरी दिली आहे.
----------------------------
मार्ग धोकादायक
गावांमधील नागरिक पूर्वापार एकत्र व्यवहार करत आले आहेत. त्यांचे सामाजिक, कौटुंबिक संबंध टिकून आहेत. त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात ये-जा करावी लागते, पण रेल्वेमार्ग, उड्डाणपुलांमुळे पायी चालण्याचा मार्ग धोकादायक झाला आहे.