एमआयडीसीची पाणी दरवाढ

एमआयडीसीची पाणी दरवाढ

Published on

एमआयडीसीची पाणी दरवाढ
डोंबिवली एमआयडीसी व उद्योजकांत असंतोष

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ - एमआयडीसीने पाणी दरात दर युनिट मागे एक ते पावणे तीन रुपयाने वाढ केली आहे. १ सप्टेंबर पासून राज्यातील सर्व निवासी व औद्योगिक क्षेत्रांसाठी ही दरवाढ लागू होणार असल्याचे परिपत्रक एमआयडीसीकडून काढण्यात आले आहे. निवासीचा सध्याचा दर हा प्रति युनिट दर रुपये ०८.२५ असा आहे तो आता रुपये ०९.२५ होणार आहे. औद्योगिक साठी पाण्याचा दर रुपये २२.५० असा होता तो आता रुपये २५.२५ प्रती युनिट असा होईल. या दरवाढीमुळे निवासी भागातील जनता व उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने परिपत्रक काढून दिनांक १ सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी दरात वाढ केल्याचे नमूद केले आहे. प्रती युनिट निवासीसाठी एक रुपया, औद्योगिक विभागासाठी पावणेतीन रुपये अशी पाणी दरात वाढ झाली आहे. या वाढीचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आणि उद्योगाला बसणार असून त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे. निवासीचा सध्याचा दर हा प्रति युनिट दर रुपये ०८.२५ असा आहे तो आता रुपये ०९.२५ होणार आहे. औद्योगिक साठी पाण्याचा दर रुपये २२.५० असा होता तो आता रुपये २५.२५ प्रती युनिट असा होईल. औद्योगिक क्षेत्रात जे कच्चा माल करीता पाणी वापर करीत असतात त्यांना रुपये २८.२५ इतकी प्रत्येकी युनिट मागे वाढ केली गेली आहे. त्यांचा पाण्याचा दर हा रुपये ८५ ते ८८ असा प्रती युनिट होईल असे नलावडे यांनी सांगितले. दोन तीन दिवसांपूर्वी हे परिपत्रक डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रहिवाशांना देण्यात आले आहे. त्या परिपत्रकावर ११ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे. राज्यभरात मुंबई येथील मुख्य कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकावर ९ सप्टेंबर रोजीची तारीख आहे. परंतू पाणी दरवाढ ही १ सप्टेंबर पासून नागरिकांना गृहीत धरुनच लागू करण्यात आली आहे. या दरवाढीबद्दल कोणीतीही हरकत घेतली जाऊ नये असेच यामुळे एकदंरीत दिसत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

नलावडे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात एमआयडीसीचे मोठे अनेक औद्योगिक आणि निवासी झोन आहेत. त्यात डोंबिवली एमआयडीसी मध्ये मोठा निवासी व औद्योगिक पट्टा आहे. एमआयडीसी मालकीचे बारवी धरण ठाणे जिल्ह्यात मुरबाड / बदलापूर भागात आहे. येथूनच ठाणे जिल्ह्यातील बहुतेक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी वसाहतीला पाणी पुरवठा होत असतो. या बारवी धरणाचे पाणी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन मधून विविध ठिकाणी पुरविले जाते. मात्र या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होते. तसेच नेहमी अधूनमधून या पाईपलाईन काही कारणाने फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असते. स्वतः एमआयडीसी कडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या गळतीचे प्रमाण एकूण १५ टक्के आहे. सदर पाण्याची चोरी, गळती रोखण्यासाठी उपाययोजना कारण्यासंदर्भात काही मान्यवर संस्था, जनतेकडून सूचना, सल्ले देण्यात आले. परंतु यावर कुठलीही उपाययोजना करण्यात एमआयडीसीला यश आलेले नाही. जर एमआयडीसी कडून पाण्याची चोरी / गळती थांबवली गेली तर एमआयडीसीला पाण्याच्या वितरणाच्या बाबतीत मोठा आर्थिक फायदा होऊन सामान्य जनतेला ते मुबलक आणि किफायतशीर दरात पाणी पुरवठा करू शकतात. पण दुर्दैव आहे की ते एमआयडीसी करू शकत नाही. एमआयडीसी प्रशासनाने आपल्या स्वतःचा ग्राहकांसाठी जे नियमित बिल भरीत आहेत त्यांना तरी ही पाणी दरवाढ करू नये इतकी अपेक्षा आम्ही करीत आहोत. काही ग्रामपंचायत / महापालिका यांच्याकडे एमआयडीसीचा पाण्याच्या बिलाची करोडो रुपयांची थकबाकी अद्याप बाकी आहे आणि ती सतत वाढतच आहे. एमआयडीसीने सदर पाण्याची ही जाचक दरवाढ मागे घ्यावी नाहीतर सर्व राजकीय पक्ष संघटना, रहिवाशी/सामाजिक/कारखानदार संघटना याविरोधात प्रखर आंदोलन करतील.

Marathi News Esakal
www.esakal.com