थोडक्यात बातम्या नवी मुंबई
पालिकेने रंगरंगोटी केलेल्या भिंती विद्रूप
वाशी, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घणसोली व कोपरखैरणे येथील भुयारी मार्गातील भिंतींवर रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आले होते; परंतु या भिंतींवर काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी फडणवीस यांचे ‘देवाभाऊ’ असे फलक लावून भिंती विद्रूप केल्या आहेत. या प्रकारामुळे पालिकेच्या सौंदर्यीकरणावर पाणी फेरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुन्हा रंगरंगोटी व स्वच्छतेवर खर्च करावा लागणार असल्याने पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
..............
दिघा आरोग्य केंद्रात सायंकाळच्या ओपीडीची मागणी
वाशी (बातमीदार) ः दिघा परिसरातील नागरिकांना सायंकाळीही आरोग्यसेवा मिळावी, यासाठी स्थायी समिती सभापती नवीन मोरेश्वर गवते यांनी वनमंत्री गणेश नाईक व पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदन दिले आहे. सध्या काशिनाथ गोविंद गवते व इलठण पाडा येथील नागरी आरोग्य केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेतच ओपीडी सुरू असते; मात्र परिसरातील कामगार व कुटुंबीय दिवसभर कामावर असल्याने त्यांना उपचारासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे गरीब, गरजू व कामगारवर्गाला दिलासा मिळावा, यासाठी संध्याकाळीही ओपीडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
....................
मनसेची पीव्हीआर आयनॉक्सवर धडक
तुर्भे (बातमीदार) ः मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने वाशीतील पाम बीच गॅलरिया मॉलमधील पीव्हीआर आयनॉक्स येथे शिष्टमंडळाने धडक दिली. मॉलमधील ‘मुव्ही जॉकी’ चॅटबॉटवर मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले होते. जाहिरात फलकावर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने मनसेने तीव्र आक्षेप घेतला. अखेरीस व्यवस्थापनाने इंग्रजी फलक काढून टाकला, सर्व मराठी चित्रपटांचे पोस्टर लावले आणि पुढे मराठीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी मनसेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
शिरवणे शाळेस मोफत बससेवा
नेरूळ (बातमीदार) ः शिरवणे गावातील पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ३०० विद्यार्थी दूरच्या वस्त्यांतून येतात. या मुलांना महामार्ग ओलांडून यावे लागत असल्याने त्यांची सुरक्षितता धोक्यात होती. तसेच प्रवास खर्चामुळे गरीब कुटुंबांवर आर्थिक ओझे येत होते. याची दखल घेत माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी सातत्याने पाठपुरावा करून पालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी दोन एसी बसची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित, वेळेची व पैशांची बचत होणार असल्याने पालक व विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.
..................
कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली
पनवेल (बातमीदार) ः मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाप्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माधव एरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षप्रवेशावेळी उपस्थित शिवसैनिकांनी नवागत कार्यकर्त्यांचे उत्साहाने स्वागत केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले, की कळंबोलीत शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांची साथ मिळणे, ही संघटनेसाठी सकारात्मक बाब आहे. तुषार जाधव, महादेव एरोळे यांच्यासह ऋतिक कुंभार, प्रशांत पाटील, पीयूष तिवारी, अब्दुल शेख, विशाल बोराडे यांनी प्रवेश केला. कार्यक्रमाला विभागप्रमुख नीलेश दिसले, रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, प्रेम गोडसे यांच्यासह अनेक शिवसैनिक नागरिक उपस्थित होते.
.............
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी
खारघर (बातमीदार) ः सिडकोने खारघर परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे फलक लावले आहेत; मात्र मनसे कार्यकर्त्यांनी या फलकांवर ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव लिहिलेले फलक चिकटवले. दि. बा. पाटील यांनी शेतकरी, मच्छीमार व प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. लवकरच विमानतळ सुरू होणार असल्याने या मागणीला अधिक जोर मिळत असून रविवारच्या रॅलीत या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.