तुर्भे नाका, स्टोअरमध्ये रुग्णालयाची उभारणी
तुर्भे नाका, स्टोअरमध्ये रुग्णालयाची उभारणी
वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश; परिसरातील नागरिकांना दिलासा
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबईतील तुर्भे नाका आणि तुर्भे स्टोअर परिसरातील गोरगरीब नागरिकांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर झाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी परिसरातच इंग्रजी माध्यम शाळा आणि ५० खाटांचे आधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे दुर्बल घटकातील मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण तर नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी मंत्री गणेश नाईक यांनी हनुमान नगर (सर्वे क्र. ३७६) येथील पीसीसी कंपनीला देण्यात आलेला भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. या जमिनीवर इंग्रजी शाळा आणि हॉस्पिटल उभारले जाणार असून, महापालिकेला त्वरित ताबा घेण्याचे आदेशही देण्यात आले. या निर्णयामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीची पूर्तता होणार आहे. गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण द्यायचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू शकणार आहे. त्याचबरोबर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दूरवर धावपळ करावी लागणाऱ्या रुग्णांना स्थानिक स्तरावर उपचार मिळण्यास सुलभ होणार आहे.
...................
अमित मेढकर यांचा पाठपुरावा
या उपक्रमामागे माजी नगरसेवक अमित अमृत मेढकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून त्यांनी या विषयावर शासनदरबारी पाठपुरावा केला होता. अखेर मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हा निर्णय म्हणजे गोरगरीब नागरिकांच्या स्वप्नपूर्तीची पहिली पायरी आहे, असे मत समाधान मेढकर यांनी व्यक्त केले.
..................
विकासाचे नवे पर्व
वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या या निर्णयामुळे तुर्भे नाका व तुर्भे स्टोअर परिसरात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे. ५० खाटांचे हॉस्पिटल हे परिसरातील आरोग्यसेवेसाठी मोठा आधार ठरेल, तर इंग्रजी शाळेमुळे दुर्बल घटकातील मुलेही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतील. हा निर्णय केवळ सामाजिक विकासाची दिशा दाखवणारा नसून, तुर्भे परिसरातील गोरगरीब नागरिकांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करणारा ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.