शिवतांडव स्तोत्राचे सर्वाधिक जलद सादरीकरण
शिवतांडव स्तोत्राचे सर्वाधिक जलद सादरीकरण
लोणावळ्यात एक मिनिट ३३ सेकंदात गायन, वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद
नेरूळ, ता. १४ (बातमीदार) ः नवी मुंबईचे सुपुत्र आणि दिग्दर्शक, निर्माते, गायक तसेच सामाजिक कार्यकर्ते विराग मधुमालती यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. शिवभक्तीच्या शिखर मानल्या जाणाऱ्या शिवतांडव स्तोत्राचे सर्वाधिक जलद गतीने सादरीकरण करून त्यांनी जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. लोणावळ्यातील कॅनरी आयलंड येथे झालेल्या या अनोख्या उपक्रमात त्यांनी संपूर्ण स्तोत्र केवळ एक मिनिट ३३ सेकंदांत उच्चारले. यामध्ये मंत्रांचे स्पष्ट उच्चार, सूर-तालातील अचूकता आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे प्रेक्षक थक्क झाले.
विराग मधुमालती हे अनेक वर्षांपासून शिव साधनेत लीन असून, मागील चार वर्षांपासून त्यांनी शिवतांडव स्तोत्रावर विशेष संशोधन केले. त्यांच्या निष्ठेचा आणि साधनेचा परिपाक म्हणजे हा विक्रम. इतक्या जलद गतीतही मंत्रांचे स्पष्ट उच्चार करण्याचे कौशल्य हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य ठरले. या कामगिरीनंतर १२ सप्टेंबर रोजी बेलापूर येथील ओम व्ही. एम. एम. स्टुडिओमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी विराग यांच्यासोबत त्यांची सहचारिणी वंदना वानखडे तसेच कॅनरी आयलंडचे संस्थापक नंदकुमार वाळंज उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी त्यांच्या विक्रमाचे कौतुक केले.
.....................
सामाजिक कार्याची अखंड धडपड
विराग मधुमालती यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक कार्यांद्वारे जनजागृती केली आहे. नेत्रदानासाठी जनजागृती : सलग १०० दिवस डोळ्यांवर काळी पट्टी बांधून दिव्यांग व्यक्तीप्रमाणे जीवन जगले आणि देशभर ठिकठिकाणी नेत्रदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले.
...................
ग्रीन वॉकथॉन : सप्टेंबर २०२४ मध्ये नवी मुंबई ते राजस्थानातील नाकोडाजी या १३०५ किमी अंतराची पदयात्रा केली. जवळपास १०० दिवसांच्या या प्रवासादरम्यान त्यांनी ५४ हजार वृक्षारोपण केले आणि गावोगावी पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.
..............
सलग २४ तासांत १११ किमी चालण्याचा विक्रम : या पदयात्रेदरम्यान त्यांनी आणखी एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. विराग मधुमालती यांच्याकडे याआधीही सात जागतिक विक्रमांची नोंद आहे. एकाच दिवसात सर्वाधिक अंतर चालण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर असून, शिवतांडव स्तोत्राच्या विक्रमाने त्यांनी पुन्हा भारताचा मान उंचावला आहे.
.................
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
त्यांचे हे कार्य केवळ भक्तिपरंपरेला जागतिक ओळख मिळवून देणारे नाही, तर समर्पण, अनुशासन आणि सकारात्मकतेचे उदाहरण म्हणून समाजासमोर उभे आहे. शिवभक्तीचा अद्वितीय आविष्कार आणि सामाजिक कार्याची तळमळ या दोन्हींच्या संगमातून विराग मधुमालती हे आधुनिक काळातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.