एमआयडीसीची पाणी दरवाढ
एमआयडीसी पाणी दरवाढ
डोंबिवलीमध्ये उद्योजक आणि नागरिकांमध्ये असंतोष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ ः एमआयडीसीने पाणी दरात दर युनिट मागे एक ते पावणे तीन रुपयाने वाढ केली आहे. १ सप्टेंबरपासून राज्यातील सर्व निवासी व औद्योगिक क्षेत्रांसाठी ही दरवाढ लागू होणार असल्याचे परिपत्रक एमआयडीसीकडून काढले आहे. निवासीचा सध्याचा दर हा प्रति युनिट दर रुपये ८.२५ असा आहे तो आता रुपये ९.२५ होणार आहे. औद्योगिकसाठी पाण्याचा दर रुपये २२.५० असा होता तो आता रुपये २५.२५ प्रती युनिट असा होईल. या दरवाढीमुळे निवासी भागातील जनता व उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
औद्योगिक विकास महामंडळाने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून प्रती युनिट निवासीसाठी एक रुपया, औद्योगिक विभागासाठी पावणेतीन रुपये अशी पाणी दरात वाढ झाली आहे. या वाढीचा फटका जनतेला आणि उद्योगाला बसणार असून त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रात कच्चा मालाकरीता पाणी वापर करत असतात. त्यांना रुपये २८.२५ इतकी प्रत्येकी युनिट मागे वाढ केली गेली आहे. त्यांचा पाण्याचा दर हा रुपये ८५ ते ८८ असा प्रती युनिट होईल, असे नलावडे यांनी सांगितले. दोन-तीन दिवसांपूर्वी हे परिपत्रक डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रहिवाशांना देण्यात आले आहे. त्या परिपत्रकावर ११ सप्टेंबरची तारीख दिली आहे. परंतु, मुख्य कार्यालयातून काढलेल्या परिपत्रकावर ९ सप्टेंबर रोजीची तारीख आहे. यानुसार पाणी दरवाढ ही १ सप्टेंबरपासूनच गृहीत धरुनच लागू करण्यात आली आहे.
नलावडे म्हणाले, ठाणे जिल्ह्यात एमआयडीसीचे मोठे अनेक औद्योगिक आणि निवासी झोन आहेत. त्यात डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा निवासी व औद्योगिक पट्टा आहे. एमआयडीसी मालकीच्या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील बहुतेक महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी वसाहतीला पाणी पुरवठा होत असतो.
पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर
बारवी धरणाच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असते. तर, अधूनमधून या पाईपलाईन काही कारणाने फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडीही होत असते. एमआयडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार पाण्याच्या गळतीचे प्रमाण एकूण १५ टक्के आहे. या पाण्याची चोरी, गळती रोखण्यासाठी उपाययोजना कारण्यासंदर्भात अनेक संस्था, जनतेकडून सूचना, सल्ले देण्यात आले. परंतु, कोणतीही उपाययोजना करण्यात एमआयडीसीला यश आलेले नाही. एमआयडीसीने पाण्याची चोरी, गळती थांबवली तर मोठा आर्थिक फायदा होईल.
आंदोलनाचा इशारा
एमआयडीसी प्रशासनाने नियमित बिल भरणाऱ्यांना ही पाणी दरवाढ करू नये, अशी अपेक्षा आहे. काही ग्रामपंचायत, महापालिका यांच्याकडे एमआयडीसीचा पाण्याच्या बिलाची कोट्यवधींची थकबाकी बाकी आहे आणि ती सतत वाढतच आहे. एमआयडीसीने ही पाण्याची दरवाढ मागे घ्यावी नाहीतर सर्व राजकीय पक्ष संघटना, रहिवाशी, सामाजिक, कारखानदार संघटना याविरोधात आंदोलन करतील, असा इशाराही एमआयडीसीला देण्यात आला.
Remarks :