समृद्धी महामार्गावर वाहनांना ‘टाटा’ची पाॅवर
समृद्धी महामार्गावर वाहनांना ‘टाटा’ची पाॅवर
मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी ‘एमएसआरडीसी’कडे चाचपणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर विजेवरील वाहने चार्ज करण्यासाठी टाटा पाॅवर ठिकठिकाणी सहा महिन्यांत मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे.
१५०-२०० किलोमीटरच्या अंतरावर आणि इंटरचेंजच्या ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने नाशिक, संभाजीनगर, शिर्डी, वर्धा, नागपूरला जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे हाेणारे प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विजेवरील वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. वाहन नोंदणीत सवलत, टोलमाफी अशा सवलतींमुळे या वाहनांच्या वापरात झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेली दिसत आहेत; मात्र त्याची क्षमता २०-४० केव्हीपर्यंतच असल्याने वाहने चार्ज होण्यास तीन-चार तास लागतात. टाटाचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक १२० केव्ही क्षमतेचे चार्जिंग स्टेशन हब आहे. तेथे एकावेळी १६ वाहने चार्ज करता येतात. तसेच येथे चार्जिंगसाठी एक तास एवढा कमी वेळ लागताे. याच क्षमतेची चार्जिंग स्टेशन समृद्धी मार्गावर उभारण्याचे नियोजन असल्याचे टाटा पाॅवरच्या ईव्ही चार्जिंग विभागाचे व्यवसाय विकासप्रमुख विरेंद्र गोयल यांनी सांगितले. याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही चार्जिंग स्टेशनचे नियोजन आहे.
पाच वर्षांत चार्जिंग स्टेशनला ‘ग्रीन पाॅवर’
टाटा पाॅवरकडून सध्या चार्जिंग स्टेशनला उपलब्धतेनुसार सौर, पवन किंवा औष्णिक वीज प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा केला जातो. मुंबईत विमानतळानजीक उभारलेल्या चार्जिंग स्टेशनला शंभर टक्के अपारंपरिक वीज प्रकल्पात (ग्रीन) तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा केला जात आहे. पुढील पाच वर्षांत देशभरात असलेल्या टाटा पाॅवरच्या चार्जिंग स्टेशनला शंभर टक्के ग्रीन एनर्जीचा पुरवठा करण्याचे टाटा पाॅवरचे उद्दिष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.