पोलिसांच्या हालचालींवर ठेवणार‘पाळत’

पोलिसांच्या हालचालींवर ठेवणार‘पाळत’

Published on

पोलिसांच्या हालचालींवर पाळत ठेवणारे ॲप तयार
स्मार्ट एचक्यू ड्युटी मॅनेजमेंट कार्यान्वित; कर्तव्यात येणार पारदर्शकता
ठाणे, ता. १४ : गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींना बेड्या ठोकण्याचे कर्तव्य बजावत असताना कोणतीही ‘गडबड’ होऊ नये म्हणून पोलिसांच्याच हालचालींवर पाळत ठेवणारे अ‍ॅप ठाणे पोलिस आयुक्तालयाने तयार केले आहे. ‘स्मार्ट एचक्यू ड्युटी मॅनेजमेंट’ असे या अ‍ॅपचे नाव असून, नुकतेच आयुक्तालय मुख्यालयात ते सुरू झाले आहे. या अ‍ॅपमुळे कर्तव्यावर असलेला पोलिस नेमका कुठे आहे, याची माहिती एका क्लिकवर कळणार आहे. त्यामुळे दैनंदिन कर्तव्यात पारदर्शकता येऊन वेळेचीही बचत होईल, असा दवा केला जात आहे.
मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदींना न्यायालयात अथवा त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेताना काहींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी वाढल्या होत्या. याप्रकरणी मध्यंतरी दोन पोलिसांवर बडतर्फीची तर १० जणांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली. विविध कारणे देत मुख्यालय सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत यात भर पडली. त्याची गंभीर दखल पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी घेतली. केवळ निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करून शिस्त लागणार नसल्याने असे प्रकार भविष्यात टाळण्याची ठोस उपाययोजनेची गरज होती. याशिवार या निमित्ताने पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणण्याची गरजही निर्माण झाली. यातूनच पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार ‘स्मार्ट एचक्यू ड्युटी मॅनेजमेंट ॲप्लिकेशन’ हे अ‍ॅप तयार केले. हे अ‍ॅप नुकतेच सह-पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले आहे. याप्रसंगी अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) श्रीकांत पाठक, पोलिस उप आयुक्त, (मुख्यालय-१) डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय-२) प्रवीण बनसोड तसेच पोलिस मुख्यालयातील पोलिस अधिकारी, अंमलदार व बिनतारी संदेश विभागातील पोलिस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. एका क्लिकवर पोलिसांच्या हजेरीपासून ते त्यांच्या ठिकाणांपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

चौकट
ठळक वैशिष्ट्ये
कर्तव्यामध्ये पारदर्शकता
जलदगतीने हजेरी व्यवस्थापन
कर्तव्याच्या नियोजनात गती
मोबाईलवर कर्तव्याच्या ठिकाणाची माहिती

चौकट
हजेरीसाठी मुख्यालय गाठण्याची गरज नाही
कर्तव्यावर हजर असलेले अंमलदार, त्यांनी केलेली कार्यवाही व कार्यमुक्तीचा अहवाल या अ‍ॅप्लिकेशनमुळे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी किंवा अंमलदार यांना मुख्यालय येथे हजेरीसाठी येण्याची गरज लागणार नाही. या अ‍ॅपद्वारे हजर मनुष्यबळाची माहिती तत्काळ मिळणार असल्याने पोलिस अंमलदारांच्या बहुमूल्य वेळेची बचत होणार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हजर मनुष्यबळ व कर्तव्यावर नेमलेल्या माहितीचा अहवाल एका क्लिकद्वारे उपलब्ध होणार आहे.

चौकट
न्यायबंदींचे लाड बंद
न्यायबंदींना न्यायालयात हजेरी लावण्यासाठी किंवा उपचारासाठी रुग्णालयात नेताना अनेक वेळा विशेष वागणूक मिळत होती. ती या अ‍ॅपमुळे बंद होईल, असा दावाही करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com