ऐरोलीतून अपहरण करून नेण्यात आलेल्या हेल्परची पुण्यातून सुटका
ऐरोलीतून ट्रकवरील सहाय्यकाचे अपहरण
पुण्यातून सुटका; वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईवर संशय
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : मिक्सर ट्रकची कारला धडक लागल्याच्या किरकोळ कारणावरून कारचालक व त्याच्या साथीदाराने मिक्सर वाहनावरील सहाय्यकाचे (क्लीनर) अपहरण करून त्याला पुण्यात नेऊन जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलिसांनी संबंधित कारचा माग काढला असता, ही कार वादग्रस्त पूजा खेडकर हिच्या पुण्यातील घरात सापडली. तेथून पोलिसांनी अपहरण झालेल्या चालकाची सुटका केली. या वेळी पूजा खेडकर हिच्या आईने अरेरावी करीत दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे या प्रकरणात पूजा खेडकर हिची आई मनोरमा यांचे नाव पुढे आले आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
मुलुंड येथून ऐरोलीमार्गे शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास खारघर येथे जाणाऱ्या मिक्सर ट्रकची किरकोळ धडक बाजूने जाणाऱ्या कारला लागली. त्यामुळे कारमधील दोन व्यक्तींनी या ट्रकचा चालक व त्याच्या सहाय्यकासोबत वाद घातला. त्यानंतर कारमधील दोघांनी सहाय्यक प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याला रबाळे पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचा बहाणा केला. त्यानंतर ते प्रल्हाद कुमार याला पुण्याच्या दिशेने घेऊन गेले. या वेळी प्रल्हाद कुमार याच्यासोबत असलेल्या चालकाने रबाळे पोलिस ठाणे गाठले असता, त्या ठिकाणी कारचालक अथवा त्याचा सहकारी आले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मिक्सर ट्रकच्या मालकाने रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या पथकाने या कारची माहिती मिळवून तिचा माग काढला. या वेळी ही कार पुण्यातील बावधन परिसरात एका सोसायटीत आढळून आली. पोलिसांनी या संबंधित सदनिकेवर छापा टाकला असता दरवाजा उघडणारी महिला वादग्रस्त पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी पूजा खेडकर हिच्या आईने दरवाजा न खोलताच पोलिसांशी अरेरावी करीत हुज्जत घातली. या वेळी ऐरोलीतून अपहरण करून आणण्यात आलेला प्रल्हाद कुमार याला या ठिकाणी जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली.
मनोरमा खेडकर यांच्या घरी अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नसले तरी या प्रकरणात मनोरमा यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी दरवाजा न उघडताच पोलिसांसोबत हुज्जत घातल्यामुळे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना रबाळे पोलिस ठाण्यात येण्याची सूचना केली आहे. या दरम्यान पोलिस व मनोरमा खेडकर यांच्यातील वादाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.