पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगणार नवरात्र उत्सव
पारंपरिक वाद्यांच्या तालावर रंगणार नवरात्रोत्सव
पोलिसांच्या नवरात्रोत्सव मंडळांना सूचना
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : यंदा उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने तसेच शिस्तबद्ध आणि शांततेत साजरा होणार आहे. डीजे व डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत, पोलिसांनी मार्गदर्शक सूचनांसह उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शनिवारी (ता. १३) विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात झालेल्या विशेष बैठकीत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ४५ ते ५० नवरात्र मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य आणि पोलिस मित्र सहभागी झाले होते.
आगामी नवरात्रौत्सव २०२५ पारंपरिक उत्साहात, पण शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. डीजे-डॉल्बी ऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर, समाजमाध्यमांवरील अफवांना बळी न पडणे, मंडप–पोस्टर वेळेत हटवणे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क ठेवणे या सूचनांवर विशेष भर देण्यात आला. बैठकीत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांसह उत्सव काळात पाळावयाच्या सर्व नियमांची माहिती मंडळांना देण्यात आली. डीजे व डॉल्बीला परवानगी नसून, पारंपरिक वाद्यांवरच भर देण्याचे आवाहन करण्यात आले. उत्सव संपताच सर्व पोस्टर्स, बॅनर्स, कमानी व मंडप तत्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आले. कोणतीही अफवा किंवा जातीवाचक संदेश सोशल मीडियावर पसरवू नयेत, अशी सक्त ताकीदही देण्यात आली.
उत्सवस्थळी अथवा परिसरात एखादी संशयास्पद व्यक्ती वा वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांनी केले. बैठकीदरम्यान गणेशोत्सव काळात उत्तम आयोजन केलेल्या चार मंडळांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या बैठकीमुळे शहरातील नवरात्रोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि पारंपरिक भक्तिभावाने साजरा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.