कल्याण-डोंबिवलीचे विद्रुपीकरण

कल्याण-डोंबिवलीचे विद्रुपीकरण
Published on

कल्याण-डोंबिवलीचे विद्रूपीकरण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : स्वच्छ सुंदर कल्याण-डोंबिवलीसाठी चेन्नई पॅटर्नचा कित्ता गिरवणाऱ्या शहराचे गणेशोत्सवाच्या काळात बॅनरबाजी आणि कमानींनी विद्रूपीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भक्तिरसाने न्हाऊन गेलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. आता आठवडाभरावर नवरात्रोत्सव आला आहे. पुढे दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, नेत्यांचे वाढदिवस तसेच येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता येत्या काळात शहराचे फलक आणि कमानींमुळे विद्रूपीकरण होणार आहे.

भक्तिरसाने न्हाऊन गेलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. उत्साह, आनंद आणि परमोच्च भक्तिभाव हे गणेशोत्सवाचे अविभाज्य अंग आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात ‘राजकीय उत्सवीकरण’ झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर (पाच वर्षे प्रशासकीय राजवट राहिली आहे) ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि सर्वच मोठ्या शहरांत पालिका निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापालिकांची प्रभागरचना जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या गणेशोत्सवात निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपल्या प्रचार-प्रसिद्धीचा श्रीगणेशा केला. त्यामुळे गणेशोत्सवात शहरात राजकीय नेतेमंडळी सार्वजनिकच नव्हे तर घरगुती गणेशासमोर नतमस्तक होत मतदारांना साकडे घालताना दिसून आली. गणेशोत्सव मंडळांनाही भरघोस देणगी मिळाल्याने तीही खूश होती. यानिमित्ताने शहरात झालेली फलकबाजी, लागलेल्या कमानी आणि विद्रूपीकरण हे शहराच्या सौंदर्याला बाधा ठरत आहेत.

यंदा प्रथमच कल्याण-डोंबिवलीत बहुसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूका होत आहेत. साहजिकच निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एक नव्हे तर चार प्रभागांमध्ये आपला संपर्क वाढवावा लागणार आहे. आपला चेहरा चारही प्रभागांमध्ये पोहोचावा, यासाठी उमेदवारांनी सणासुदीच्या शुभेच्छा फलकांनी प्रभागातील रस्ते, चौक व्यापून टाकले आहेत. गणेशोत्सव नुकताच होऊन गेला असून नवरात्रोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला आहे. त्यातच सध्याच्या घडीला कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी शहरभर त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. वरिष्ठांना खूश करून उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठीदेखील हितचिंतकांचा हा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

रस्ते, चौक, दुभाजक, सार्वजनिक ठिकाणे, महामार्ग, ग्रामीण भाग, विसर्जन तलाव, कृत्रिम तलाव, मैदान परिसर अशा सर्वच ठिकाणी लागलेल्या राजकीय फलकांनी शहर अस्वच्छ झाले आहे. गणपती मंडप निघाल्यानंतर त्याबाहेरील फलक मंडळांनी हटविले आहेत; मात्र कमानी आजही तशाच आहेत. नवरात्रोत्सवात याच कमानींवर नवरात्रीच्या शुभेच्छा दिसून येतील. त्यानंतर दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा लागतील.
या कमानींमुळे शहरात वाहन कोंडीची समस्या निर्माण होत असली, तरी त्याविरोधात कोणीही आवाज उठविण्यास तयार नाही. काही जागरूक नागरिक याविषयी समाजमाध्यमांतून व्यक्त होताना दिसतात. पण शहराचे पालकत्व सांभाळणाऱ्या महापालिका प्रशासनाला ही फलकबाजी, कमानी जणू दिसतच नाहीत, असेच चित्र आहे.

पालिकेच्या महसुलावर पाणी
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या जाहिराती, फलक किंवा कमान हा केवळ शहर विद्रूपीकरण आणि अव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर हा प्रशासकीय उत्पन्नाशी निगडित मुद्दा आहे. व्यावसायिक वा सामाजिक (ज्यात राजकीयही मोडतात) जाहिरात फलकांसाठी महापालिकेने शहरातील जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर जाहिराती लावण्यासाठी पालिकेकडून सशुल्क परवानगी घ्यावी लागते. म्हणजे यातून पालिकेला महसूलही मिळतो. गणेशोत्सव काळात शहरात किमान एक-दोन लाख फलक लागले, असा निव्वळ अंदाज लावला तरी पालिकेला एक-दोन कोटींचा महसूल सहज मिळाला असता. परंतु पालिका प्रशासनाने फलकांच्या परवान्यासाठी आग्रह धरल्याचे किंवा बेकायदा फलकांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.

मंडळांवर वर्गणीचा पाऊस
अनेक सार्वजनिक गणपती मंडळांनी आपल्या मंडपाशेजारच्या जागांवर फलकबाजीसाठी, कमानींसाठी राजकीय नेतेमंडळींकडून भरभरून वर्गणी मिळवल्याचे दिसून आले. एकूणच काय तर पालिकेने महसुलावर पाणी सोडले आणि शहराचे विद्रूपीकरणही रोखले नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com