खड्डे बुजवा, अन्यथा जनआंदोलन!
खड्डे बुजवा अन्यथा जनआंदोलन!
माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा
कल्याण, ता. १५ (बातमीदार) : गणेशोत्सवानंतर कल्याण पूर्वेतील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तात्पुरते बुजवलेले खड्डे सध्या पुन्हा उघड्या स्वरूपात दिसून येत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी महापालिकेला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, त्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास प्रखर जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पूना लिंक रोड, कोळसेवाडी, काटेमानिवली, चिंचपाडा रोड, म्हसोबा चौक आणि मलंगगड रोड या प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. काही आठवड्यांपूर्वीच दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा उखडले असून, प्रवाशांचे कंबरडे मोडणारे हे रस्ते वाहतूक सुरक्षेसाठीही गंभीर धोका बनले आहेत. रिक्षाचालकांचे वाहनांचे पार्टस खराब होत असून, त्यांचा दुरुस्ती खर्च वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
महेश गायकवाड यांनी महापालिकेवर टीका करताना सांगितले की,‘‘गणेशोत्सवाच्या आधी रस्ते डागडुजीसाठी निधी खर्च करण्यात आला, पण कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. नागरिकांच्या कराच्या पैशाचा असा अपव्यय होत आहे, हे दुर्दैवी आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘महापालिका आयुक्तांसोबत नुकताच पाहणी दौरा झाला होता, तरीही परिस्थिती पूर्ववतच आहे. आता नवरात्रोत्सव डोळ्यासमोर आहे. त्याआधी रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.’’ ‘‘महापालिकेला दिलेल्या चार दिवसांच्या अल्टिमेटमनंतरही सुधारणा न झाल्यास नागरिकांचा प्रचंड रोष ओढवेल,’’ अशी स्पष्ट चेतावणी गायकवाड यांनी दिली आहे.