
उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : फक्त तीन तासांच्या कार्यक्रमासाठी तब्बल १८ हजार रुपये दिवसभराचे भाडे आकारल्याने कलावंतांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. ही बाब आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आणून देत तासांवर भाडे आकारण्याची मागणी ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी केली होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून, आता सकाळ व दुपारच्या आरक्षणासाठी तीन हजार आणि संध्याकाळी; तसेच नंतरच्या आरक्षणासाठी पाच हजार रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे.
उल्हासनगर पश्चिमेकडील राजीव गांधी सपना उद्यानालगत महानगरपालिकेची सिंधुभवन इमारत आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर सभागृह, तर दुसऱ्या मजल्यावर ३०० आसन क्षमतेचे वातानुकूलित प्रेक्षागृह आहे. ध्वनी व्यवस्था असलेल्या या सभागृहासाठी आतापर्यंत दिवसभराचे सरसकट १८ हजार रुपये भाडे आकारले जात होते. त्यामुळे नाट्य, संगीत, साहित्यिक कार्यक्रमांसाठी कलावंत मंडळी सिंधुभवनपासून दूर राहत होती. एखाद्या कार्यक्रमासाठी काही तासांसाठी सिंधुभवनचे आरक्षण करायचे झाले, तरी महापालिका दिवसभराचेच भाडे आकारत होते. आमचा ठराव दिवसभरासाठीचा आहे, असे मालमत्ता विभागातून अर्जदारांना सांगितले जात होते. वास्तविक, सार्वजनिक बांधकाम विभागाने वास्तुचे भाडे ठरवून दिल्यानंतर ते तीन-तीन तासांमध्ये विभागणे मालमत्ता विभागाचे काम होते; पण ते न झाल्याने नागरिकांना मोठा भूर्दंड पडत होता.
जून महिन्यात संगीतकार, गायक हेमंतकुमार यांना आदरांजली कार्यक्रमावेळीही वाद निर्माण झाला होता. कायद्याने वागा लोकचळवळ आणि पालिका आमनेसामने आली होती. त्यानंतर राज असरोंडकर यांनी मालमत्ता उपायुक्त स्नेहा करपे यांच्याशी चर्चा करून तासांवर भाडे आकारण्याचा प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिल्यामुळे सकाळ आणि दुपारच्या आरक्षणासाठी प्रत्येकी तीन हजार आणि संध्याकाळ व नंतरच्या आरक्षणासाठी अंदाजित पाच हजार इतके भाडे आकारले जाणार आहे. यासाठी असरोंडकर यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे आणि उपायुक्त स्नेहा कर्पे यांचे आभार मानले आहेत. मान्यता दिल्याने कलावंतांना दिलासा मिळाला आहे.
पालिकेला उत्पन्न मिळणार
शहरात आता ठिकठिकाणी कराओके क्लब सुरू झाले आहेत. गायक व नाट्य कलाकारांची मोठी संख्या आहे. शहरात साहित्यिक चळवळही कार्यरत आहे. तासांवर भाडे आकारले जाणार असल्यामुळे आता सिंधुभवनमध्ये नाट्य, संगीत, साहित्यिक करणे परवडणार आहे. त्यामुळे कार्यक्रमांची वारंवारता वाढेल आणि पालिकेला उत्पन्न मिळेल, ज्यातून सिंधुभवनची देखभाल होऊ शकेल, असे राज असरोंडकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.