
दमदार पावसामुळे खालापूर तालुक्यात जलसंपदा परिपूर्ण
धरणे, तलाव शंभर टक्के भरल्याने दिलासा
खोपोली, ता. १५ (बातमीदार) : यंदाच्या पावसाळ्यात खालापूर तालुका आणि खोपोली परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे येथील प्रमुख धरणे, तलाव आणि पाझर तलाव शंभर टक्के भरून वाहू लागले आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे ऑगस्ट अखेरीस सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून सप्टेंबर महिन्यातील उर्वरित पावसामुळे ही जलसंपदा आणखी बळकट झाली आहे. परिणामी भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.
खालापूर तालुक्यातील आडोशी, कलोते-मोकाशी आणि डोनवत धरणे पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाची आहेत. यावर्षी या धरणांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. खोपोली–पेण मार्गावरील डोनवत धरण तर ओव्हरफ्लो होत असून आसपासच्या गावांना मुबलक पाणी पुरवठा सुरू झाला आहे. तांबाटी, वावोशी, सावरोली-डोनवत आदी गावांसह आदिवासी वाड्यांना याचा थेट फायदा होत आहे. शेती, भाजीपाला उत्पादन आणि लघुउद्योग यांना आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, मोरबे धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. हे धरण नवी मुंबई महापालिकेने विकत घेतले असून, नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी हेच प्रमुख साधन आहे. धरणाची क्षमता तब्बल १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून यामुळे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा त्रास होणार नाही. भिलवले, कलोते-मोकाशी आणि डोनवत धरणे अनुक्रमे २.१०, ४.१९ आणि ३.२७ दशलक्ष घनमीटर क्षमतेची असून शेती व उद्योग क्षेत्रासाठी त्यांचा महत्त्वपूर्ण वापर केला जातो.
.................
रायगड जिल्ह्यात पाटबंधारा विभागाच्या अखत्यारीत २८ धरणे असून, खालापूर तालुक्यातील प्रमुख धरणांसह असंख्य पाझर तलावही पावसामुळे तुडुंब भरले आहेत. आत्करगाव, नढाळ, उसरोली आणि गावागावांतील तलावसुद्धा ओसंडून वाहत असल्याने संपूर्ण तालुक्यातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे जलसंपदा परिपूर्ण झाल्याने हिवाळा व उन्हाळ्यातील पाणीपुरवठा निर्विघ्न राहणार आहे. औद्योगिक क्षेत्र, शेतकरी, आदिवासी बांधव आणि नवी मुंबईतील नागरिक या सर्वांना याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे. समाधानकारक पावसामुळे खालापूर तालुक्याचा पाणीप्रश्न सुटल्याने स्थानिकांसह प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.