
राज्यमार्ग खड्ड्यांनी पोखरला
डहाणू-जव्हार प्रवासादरम्यान मनस्ताप
कासा, ता. १५ (बातमीदार)ः डहाणू-जव्हार राज्यमार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून वाहन चालवणे अतिशय धोकादायक झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच डहाणू-चारोटी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले होते, पण मुसळधार पावसामुळे या रस्त्याची पुन्हा दुर्दशा झाली आहे. या मार्गावरील तलवाडा-सोलशेत यादरम्यान रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनांची रहदारी असलेल्या मार्गावर वाहनांचे नुकसान होत आहे, तर सततच्या हादऱ्यांमुळे अनेकांना विविध आजार जडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे एकप्रकारे जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याचे वाहनचालक रवींद्र बेंदर यांनी सांगितले.
---------------------
निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली होती, पण आता कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता नितीन पगारे यांनी सांगितले.