ट्रक सजावटीच्या साहित्य विक्रीतून कुटुंबांचा उदरनिर्वाह
ट्रक सजावटीच्या साहित्यविक्रीतून कुटुंबांचा उदरनिर्वाह
टोलनाक्याजवळ गजबजलेला व्यवसाय
कासा, ता. १५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या टोलनाक्याजवळ आणि जकात नाक्यांच्या परिसरात अनेक कुटुंब हातगाड्या किंवा छोट्या टोपल्यांमधून ट्रक आणि अवजड वाहनांना लागणारे सजावटीचे साहित्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
रंगीबेरंगी रेडियम, कृत्रिम फुले, स्टिकर्स, झेंडू-गुलाबसदृश सजावट, वाहनांवर लावले जाणारे विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य येथे विक्रीसाठी उपलब्ध असते. हे साहित्य विक्रेते दिवसभर टोलनाक्याजवळ अथवा महामार्गावरील मोठ्या हॉटेलांशेजारी उभे राहून ग्राहकांची वाट पाहतात. ट्रकचालक आणि इतर अवजड वाहनांचे चालक यांच्याकडून चांगली मागणी असल्याने त्यांचा हा व्यवसाय टिकून असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसाला साधारण ७०० ते ८०० रुपये कमाई होत असल्याने कुटुंबाचा खर्च भागवला जातो.
व्यवसाय कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन
शिवम चतुर्वेदी या विक्रेत्याने सांगितले की, आम्ही मूळचे कोलकाता येथील आहोत. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात हा व्यवसाय सुरू आहे. ट्रक सजावटीसाठी लागणारे साहित्य आम्ही मुंबई आणि अहमदाबाद येथील बाजारपेठेतून आणतो. मोठ्या अवजड वाहनांचे चालक आमच्याकडून सजावट करून घेतात. हा व्यवसाय आमच्या कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन आहे आणि तो आम्ही पारंपरिक स्वरूपात चालवत आलो आहोत.