कासा मुख्य रस्त्यावर महावितरणचा पोल नादुरुस्त
कासा मुख्य रस्त्यावर महावितरणचा खांब जीर्ण अवस्थेत
कासा, ता. १५ (बातमीदार) : डहाणू–नाशिक राज्य मार्गावरील कासा बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर उभा असलेला महावितरणचा खांब पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून कधीही कोसळून मोठा अपघात घडू शकतो. पोलचा खालचा भाग गंजल्याने तो डळमळीत झाला आहे. याशिवाय त्यावरील वायर लोंबकळल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ठिकाणी पोलच्या शेजारी खाजगी रुग्णालय आणि मेडिकल दुकान असल्याने येथे सतत नागरिकांची मोठी वर्दळ असते. दोन दिवसांपूर्वी खांबाच्या आजूबाजूस करंट पसरल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. तेथील मेडिकलमध्ये कार्यरत असलेले कर्मचार्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दुकानाच्या शटरसह आजूबाजूच्या भागात करंट येत होता. त्यामुळे भीतीचे वातावरण परिसरात पसरले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्पुरती दुरुस्ती केली, परंतु समोरील हा जीर्ण पोल तातडीने बदलणे आवश्यक असण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात महावितरणचे कासा विभागाचे अभियंता मोहन बनसोड यांनी सांगितले की, “सदर जीर्ण खांब बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच परिसरात करंट येण्याच्या प्रकारांवरही दक्षता घेण्यात येईल,” असे आश्वासन दिले. नागरिक मात्र खांब तातडीने बदलून कायमस्वरूपी सुरक्षितता द्यावी, अशी मागणी सातत्याने करत आहेत.