सुसरी नदीवरील पुलावर तात्पुरती दुरुस्ती

सुसरी नदीवरील पुलावर तात्पुरती दुरुस्ती

Published on

धानिवरी सुसरी नदीवरील पुलावर तात्पुरती दुरुस्ती
नागरिकांना खड्ड्यांचा त्रास; सिमेंट काँक्रीट रस्त्यावर शेवटी डांबर वापरून डागडुजी
कासा, ता.१५ (बातमीदार) : मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथील सुसरी नदीवरील पूल गेल्या काही वर्षांपासून नादुरुस्त असून, पुलावर वारंवार खड्डे पडल्याने मोठे अपघात घडत आहेत. महागडा खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला असला तरी पुलावरील खड्ड्यांनी वाहनचालकांचे हाल कायम ठेवले आहेत. वारंवार तात्पुरती दुरुस्ती करूनही समस्या सुटत नाही. शेवटी खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा डांबराचा वापर करावा लागला आहे.
या पुलावरून दररोज शेकडो वाहनांचा प्रवास होत असून, खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणाने पुलाची तातडीने दुरुस्ती करून नवीन पूल उभारावा, अशी मागणी केली आहे. गेल्या दीड वर्षापासून महामार्गावर सिमेंट काँक्रीट झाले असले तरी खड्डे पडत आहेत. सुसरी नदीवरील धानिवरी पुलावर मोठे चोळ्याबाहेर येत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. सिमेंट काँक्रीट करून काय साधले, शेवटी खड्डे बुजवायला डांबरच वापरावे लागले असे उपसरपंच हरेश मुकणे यांनी सांगितले.
नागरिकांच्या या मागण्यांकडे महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्याने लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती केली नाही तर संतप्त वाहनचालकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याबाबतीत महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक सुहास चिटणीस म्हणाले की, सध्या पाऊस सुरू असल्याने सिमेंट काँक्रीट खड्ड्यात टिकत नसल्याने पुन्हा आम्ही डांबर टाकूनच खड्डे बुजवत आहोत अनेक ठिकाणचे खड्डे लवकरात लवकर बुजवले जातील व वाहन चालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

Marathi News Esakal
www.esakal.com