पावसाने तारांबळ
पावसाने तारांबळ
पनवेल परिसरातील सखल भागांना फटका
पनवेल, ता. १५ (बातमीदार)ः पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणे रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने जलमय झाली. पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवासी वसाहतींमधील जनजीवन विस्कळित झाले होते.
पनवेल शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने नवीन पनवेल परिसराला सर्वाधिक झोडपले. माथेरानच्या डोंगर परिसरातील पाण्यामुळे गाडी नदीला पूर आला. अशातच सोमवारी सकाळी भरतीची वेळ असल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तथापि पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा जलद गतीने झाला, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने केलेल्या भरावाचा फटका गाढी नदीलगतच्या परिसराला बसला. कळंबोली कॉलनीतील सखल भागात पाणी साचले होते, तर खांदा कॉलनीत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे पनवेलकरांची तारांबळ उडाली.
---------------------------------
नवीन पनवेलला फटका
- नवीन पनवेल कॉलनीमध्ये अभ्युदय बँक ते अय्यप्पा मंदिरपर्यंतचा रोड पूर्णपणे पाण्यात गेला होता. बांठिया स्कूलसमोर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. अनेकांच्या वाहनांमध्येही पाणी घुसले. येथील ए टाइपच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे नुकसान झाले.
- माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पंप बंद असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. पहाटे पंपिंग सुरू झाल्यानंतर हळूहळू पाण्याचा निचरा होऊ लागला. पावसामुळे एचडीएफसी सर्कल ते पनवेल रेल्वेस्थानकाच्या रोडवर वाहतूक कोंडी होती.
ः-----------------------------
संततधार पडणाऱ्या पावसामुळे नवीन पनवेल परिसरात काही ठिकाणी पाणी भरण्याचे प्रकार घडले. पाऊस ओसरल्यानंतर तत्काळ पाण्याचा निचरा झाला. ज्या ठिकाणी पाणी साचले होते, तेथे पालिका पथकांकडून तातडीने उपसा केला जात आहे.
ः-डॉ. रूपाली माने, उपायुक्त, पनवेल पालिका