टेम्पोची टँकरला धडक
टेम्पोची टँकरला धडक
अपघातात एकाचा मृत्यू, दोन जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे ,ता. १५ : शहरातील नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवरील पूर्व द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या एका वॉटर टँकरला एका तीनचाकी टेम्पोने जोरदार पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी (ता. १४) रात्री पावणेबारा ते बाराच्या दरम्यान समोर आली. या घटनेत तीनचाकी टेम्पोत अडकलेल्या बबलू याचा मृत्यू झाला असून, डॅनियल नाईक (५६) आणि आलम शेख (२९) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्या दोघांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
भरधाव वेगाने कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या तीनचाकी टेम्पोने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका वॉटर टँकरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोचालकाची केबिन अक्षरशः चेपली आणि त्या टेम्पोच्या केबिनमध्ये तीन जण असल्याची माहिती दक्ष नागरिक लक्ष्मण कनोजिया यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांनी धाव घेतली. तातडीने अडकलेल्या तिघांना त्या टेम्पोचालकाच्या केबिनमधून बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या वेळी तेथील डॉक्टरांनी बबलू याला मृत घोषित केले. तसेच डॅनियल यांच्या डोक्याला आणि पायाला, तर आलम याच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर सदर टेम्पो कोण चालवत होता, हे अद्यापही समजू शकले नाही, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.