भिवंडीत आमणे नोड विकसित होणार
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १५ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील पहिले इंटरचेंज भिवंडी तालुक्यातील आमणे गावात आहे. या ठिकाणी ‘आमणे नोड’ या नावाने औद्योगिक केंद्र विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईजवळील हे नोड भविष्यात बीकेसी आणि नोएडाच्या धर्तीवर विकसित होणार आहे. अर्थात, जिल्ह्यातील मोठे व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पहिला टोलनाका तालुक्यातील आमणे येथे आहे. या मार्गावरून नागपूर आठ तासांत, दिल्ली १२ तासांत आणि जेएनपीटी-अलिबाग दोन तासांत गाठता येणार आहे. आमणे इंटरचेंजमुळे गाड्यांना वेग कमी न करता मार्गिका बदलता येणार आहे. त्यामुळे या परिसराचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. त्यामुळे या परिसरात सरकारने ‘आमणे नोड’ नावाने औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे ठरविले आहे.
भविष्यात मुंबई आणि परिसरातील उद्योग नव्याने स्थिर होतील आणि मुंबईतील औद्योगिक उत्पादनांनाही दिल्ली, नागपूर आणि जेएनपीटी बंदरावर कमी वेळेत नेता येणार आहे. समृद्धी महामार्गावर विविध ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित होणार असले, तरी आमणे नोडला जास्त महत्त्व येणार आहे. या मार्गामुळे जेएनपीटी ते अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गाला एक पर्याय निर्माण झाला आहे. तसेच ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांना आमणे नोड जोडला जाणार असल्याने जिल्ह्यातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
४६ गावांचा समावेश
तालुक्यातील गावाच्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या महामंडळाद्वारा भिवंडीतील अन्य काही गावांतील क्षेत्रामध्ये संतुलित व नियोजनबद्ध विकास करण्यात येणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार अधिसूचित क्षेत्रातील तालुक्यातील ३२ आणि कल्याण तालुक्यातील १४ अशा एकूण ४६ गावांचा समावेश आहे.
उद्योगाच्या संधी
आमणे नोड हे १० हजार ७९१ हेक्टर क्षेत्र आहे. सरकारने येथे इंडस्ट्री पार्क, लॉजिस्टिक हब, फूड प्रोसेसिंग पार्क आणि अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे परिसरातील तरुणांना उद्योगाच्या संधी निर्माण होणार आहेत. तर आर्थिक चलनही वाढणार आहेत.
भिवंडीत औद्योगिक केंद्रे उभी
स्वातंत्र्यानंतर देशात आणि राज्यात आर्थिक चलन वाढविण्यासाठी आणि उद्योग व्यवसायांना चालना देण्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी अनेक औद्योगिक केंद्रे उभी राहिली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्येही लाखोंच्या संख्येने यंत्रमाग आणि त्याला पूरक डाईंग-सायझिंग उभ्या राहिल्या. प्लॅस्टिकपासून मोती बनविणारे शेकडो कारखाने उभे राहिले. त्याचप्रमाणे गोदामाच्या नावाखाली रसायनांची साठवणूक होऊ लागली.
स्वच्छ व प्रदूषणविरहित शहरासाठी पुढाकार आवश्यक
शहराच्या लोकवस्तीचे नियोजन नसल्याने नागरिकांच्या जीवाला घातक असलेले कारखाने घराजवळ आली. अशी सर्व औद्योगिक कारखाने नव्याने स्थापित झालेल्या औद्योगिक क्षेत्रात स्थापित झाल्यास भिवंडीकर मोकळा श्वास घेऊ शकतील. हीच स्थिती ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. रसायनाचा स्फोट, रसायनाची गळती, कंपन्यांना आगी लागणे आदी घटना नेहमी घडून नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र निर्माण करताना स्वच्छ व प्रदूषणविरहित शहरे निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.