मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा विरार मध्ये स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा विरारमध्ये स्नेहमेळावा
नालासोपारा, ता. १५ (बातमीदार) : येथील मराठवाड्याच्या रहिवाशांचा स्नेहमेळावा विरारमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यातील डॉक्टर, व्यावसायिक, पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे दोनशेपेक्षा अधिक कुटुंब वसई-विरारमध्ये वास्तव्यास आहेत. या नागरिकांनी आपल्या परिवारासह स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आपली कौटुंबिक नाळ जोडली आहे.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवार (ता. १४) रोजी न्यू विवा महाविद्यालयाच्या सेमिनर हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते. रवींद्र मळवटकर यांनी मराठवाड्याचे गुणगाण आपल्या स्वागतगीतातून मांडले, तर लेखक कवी अमोल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचा उद्देश व भविष्यकालीन वाटचाल यावर सविस्तर भाष्य केले. या वेळी मूळचे मराठवाड्यातील परंतु वसई-विरारमध्ये स्थायिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डाॅ. बळीराम पारसेवार, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. महादेव तोंडारे, शिक्षक लहुकुमार शिंदे, अमोल वाघमारे, भरत वटाणे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराडवाडा सांस्कृतिक मंडळ कोअर टीममध्ये असलेले कवी लेखक अमोल पाटील, विनायक चोले, राजपाल रेड्डी, रवी पफाळ, प्रा. गोपीनाथ नागरगोजे, शरद कांबळे, अमरदिप अचेमवार, लहुकुमार शिंदे, अमोल वाघमारे, ज्ञानोबा शिंदे, शितल कुलकर्णी, शिल्पा घुगे, राजू मुंडे, रवी सोनवणे, निसार तांबोळी, नरेश देबडवार, रवींद्र मळवटकर यांनी परिश्रम घेतले.