ऐरोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई
ऐरोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पालिकेकडून दोन बांधकामे जमीनदोस्त; ५० हजारांचा दंड वसूल
वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने ऐरोली परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करीत दोन मोठी बांधकामे जमीनदोस्त केली.
येथील सेक्टर ३मध्ये बी-८६ व जे-२६ या ठिकाणी रत्नप्रभा कदम आणि मदरू कुपया रग्या यांच्या मालकीची बांधकामे परवानगीशिवाय उभारली गेली होती. याबाबत विभागीय कार्यालयाने नोटीस बजावली होती. दरम्यान, संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्याने अखेर प्रत्यक्ष तोडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. ऐरोली विभाग अधिकारी सुनील काठोळे यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण नियंत्रण विभागाने बांधकामे पाडली. या कारवाईत प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. कारवाईसाठी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी, सात मजूर, दोन ब्रेकर, एक गॅसकटर तसेच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करीत अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पालिकेने सातत्याने धडक मोहीम चालू ठेवावी, अशी मागणी केली. पालिकेकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असून, दंडात्मक शुल्काशिवाय थेट तोडक मोहीम हाच मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला.