झाडांवरील रोषणाईने कीटक, पक्ष्यांना धोका
झाडांवरील रोषणाईने कीटक, पक्ष्यांना धोका
ठाण्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : उच्च न्यायालयाचे आदेश डावलून ठाण्यात विसर्जन घाटांवर सहा फुटांपेक्षा कमी उंच मूर्तींचे विसर्जन झाले आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रणाच्या लढ्याला यश आलेले दिसत नाही, ही खेदाची बाब ठाण्यात घडलेली असतानाच उच्च न्यायालयाच्या आणखी एका आदेशाला पालिका यंत्रणा आणि लोकांकडून बगल दिली जात आहे. शहरातील झाडांवर विद्युत रोषणाई केली जात आहे. सध्या सण, उत्सवांचा मोसम सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता दुकानदार, व्यापाऱ्यांकडून दुकानासमोरील झाडांवर अशी रोषणाई केली जात असून, ठाणे महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
नुकतेच गणपती उत्सवाचे १० दिवस मोठ्या आनंदात गेले. आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. शहरातील रस्ते आणि रस्त्यांवरील झाडांवर हौशी लोकांकडून विद्युत आरास केली जाणार आहे. झाडांच्या फांद्या आणि खोडांवर विद्युत तोरणांच्या लडी गुंडाळल्या जाणार आहेत. यामुळे झाडांवर घरटे करून वसलेल्या पक्ष्यांना आणि कीटकांना धोका निर्माण झाला आहे. निसर्गाची जैविक साखळी धोक्यात येत आहे. पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केलेल्या धोक्याची दखल घेत उच्च न्यायालयाने झाडांवर विद्युत आरास करण्यास मनाई करण्यात आल्याने हे प्रकार थांबणे आवश्यक आहे, मात्र ठाणे महापालिकेच्या हद्दीत बाजारपेठांमध्ये असे प्रकार दिसू लागले आहेत. नवरात्र आणि दिवाळीच्या निमित्ताने शहरात अशा रोषणाईमध्ये वाढ होणार आहे. झाडांवर अशी रोषणाई करणे हे झाडांच्या आयुष्यासाठी अत्यंत हानिकारक आहेच, परंतु झाडांवर वास्तव्यास असलेल्या सर्व प्रकारचा जीवजंतूंना अत्यंत धोक्याचे आहे. या रोषणाईमुळे झाडांवर असलेल्या पक्ष्यांना अपंगत्व येत आहे. त्यांच्या प्रजननाला बाधा पोहोचत आहे. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. झाडांवर असलेल्या अनेक पिढ्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे,असे गंभीर निरीक्षण पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी केले आहे.
कोट
सूर्यास्तानंतर झाडांची चयपचय क्रिया मंदावते. या वेळेत झाड वातावरणातला ऑक्सिजन वायू घेऊन कार्बनडाय ओक्साईडचे उत्सर्जन करते. त्यातच रात्रीच्या वेळी झाड निद्रावस्थेत असते. त्यामुळे त्याची साखर मिळवण्याची क्रिया थांबलेली असते. पण रात्री विजेच्या माळांच्या उजेडामुळे उष्णता मिळत असल्याने त्यांची दिनचर्या बिघडते आहे. झाडांच्या नैसर्गिक दिनचर्येत बदल होणे हे त्याच्या अस्तित्वाला नुकसान पोहोचवणारे आहे.
- डॉ. प्रमोद साळसकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ