ठाण्यात पावसाची दमदार हजेरी

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी

Published on

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी
जनजीवन विस्कळित; वाहतुकीचा वेग मंदावला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : जिल्ह्यात रविवारी (ता. १४) रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या वेळी विजेच्या कडकडाटात पावसाने धुमाकूळ घातला. दुसऱ्या दिवशीदेखील सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला होता. पावसाचीही संततधार सुरूच होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले.
मुंबई, ठाणे शहराला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने रविवारी (ता. १४) दिला होता. रविवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला. दुसरीकडे उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर परिसरातही पावसाची रिपरिप सुरू होती. शहराअंतर्गत तसेच महामर्गावरील काही रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती. आधीच रस्त्यावर पडलेले खड्डे त्यात पाऊस यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना अडथळा येत होता. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आनंदनगर जकात नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहने बराच वेळ या कोंडीत अडकून होती.


ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३३.४९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर दुपारनंतर ठाणे शहरात पाऊस ओसरला होता. डोंबिवली आणि कल्याण शहरात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

रायगडला ऑरेंज अलर्ट
अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली. परिणामी येथील जनजीवन विस्कळित झाले. दोन दिवसांच्या रेड अलर्टनंतर हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, माथेरानमध्ये १० तासांत २७१.४ मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस पडला. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा माथेरानमध्ये झाला.
हवामान विभागाच्या अलर्टमुळे येथील मच्छीमारांनीही आपल्या नौका किनाऱ्याला लावल्या आहेत. मुंबई-मांडवा, दिघी-आगरदांडा जलवाहतुकीलाही या पावसाचा फटका बसला. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर काही फेऱ्या सोडण्यात आल्या. हवामानाचा अंदाज घेऊन जलवाहतूक फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बंदर विभागाच्या वतीने देण्यात आली. कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा नद्यांची पातळी काही प्रमाणात वाढली असली तरी सध्या नदीकाठच्या गावांना कोणताही धोका नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com