अपघातांवर भूयारी मार्गाचा उतारा
अपघातांवर भुयारी मार्गाचा उतारा
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एमयूटीपी-४ अंतर्गत प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : उपनगरीय रेल्वे मार्गावर रूळ ओलांडण्यामुळे दरवर्षी शेकडो प्रवाशांचे प्राण जातात. या धोकादायक समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आता पादचारी पूल किंवा स्कायवॉकऐवजी भुयारी रेल्वे मार्ग (सबवे) बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. दोन स्थानकांच्या मधल्या अतिक्रमणप्रवण भागात सबवे उभारला जाणार असून, जमिनीखाली सुमारे चार मीटर खोलीवरून नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) चौथ्या टप्प्यांतर्गत हा आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत एफओबी, आरओबी आणि स्कायवॉक उभारून रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पायऱ्या चढण्या-उतरण्याची कटकट आणि वेळ वाचविण्याच्या घाईपोटी प्रवासी थेट रुळांवरून जात असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे सबवेच्या पर्यायावर भर देण्यात येणार आहे.
जलरोधक सबवेची तयारी
सध्या अस्तित्वात असलेल्या सबवेमध्ये गळती व पाणी साचण्याची समस्या कायम दिसते. त्यामुळे एमआरव्हीसीने जलरोधक सबवेची संकल्पना पुढे नेण्यासाठी तांत्रिक अभ्यास सुरू केला आहे. या कामासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेण्याची तयारी आहे.
एमयूटीपी-३ मधील अनुभव
एमयूटीपीच्या तिसऱ्या टप्प्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ३४ ठिकाणे धोकादायक म्हणून ओळखण्यात आली होती. तेथे पादचारी पूल, आरओबी आणि संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. यासाठी तब्बल ५५१ कोटी रुपये खर्च झाले. या टप्प्यातील ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम महिनाअखेर पूर्ण होणार आहे. रेल्वे प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मोठ्या संख्येने प्रवासी रूळ ओलांडतात आणि अपघातांना बळी पडतात. त्यामुळेच आता सबवेच्या स्वरूपात नवा व सुरक्षित पर्याय उभारण्याचा एमआरव्हीसीचा निर्धार आहे.
अशा आहेत उपाययोजना
- प्लॅटफॉर्मच्या शेवटी धातूचे बॉक्स
- दोन प्लॅटफॉर्मदरम्यान बॅरिकेडवर ग्रीस लावणे
- दंड आकारणी
संरक्षक भिंतीचे काम
- मध्य रेल्वे : ३२.९१४ किमी
- पश्चिम रेल्वे : १०.७५ किमी
रूळ ओलांडताना मृत्यू-अपघात
२०१९ : मृत्यू १,४५५, जखमी २७६
२०२० : मृत्यू ७३०, जखमी १२९
२०२१ : मृत्यू १,११४, जखमी १७६
२०२२ : मृत्यू १,११८, जखमी २०१
२०२३ : मृत्यू १,२७७, जखमी २४१
२०२४ : मृत्यू १,०४४, जखमी २२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.