जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण :
बुरखा घातल्यामुळेच
चेतनसिंहकडून लक्ष्य
महिला साक्षीदाराची न्यायालयात आपबिती
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून चार जणांची हत्या करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीने आपल्याला बुरखा घातल्यामुळे लक्ष्य केले. तसेच बळजबरीने बंदुकीच्या धाकावर ‘जय माता दी’ बोलण्यास भाग पाडले होते, अशी साक्ष प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या महिलेने सोमवारी (ता. १५) कनिष्ठ न्यायालयात दिली.
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये ३१ जुलै रोजी बेछूट गोळीबार करून आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या करणारा रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतनसिंह चौधरीविरोधात कनिष्ठ न्यायालयात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. त्या वेळी आपण बुरखा परिधान केल्यामुळे चौधरीने बंदुकीच्या धाकावर ‘जय माता दी’ असे म्हणण्यास भाग पाडले होते; परंतु संधी मिळाल्यानंतर आपण चौधरीची रायफल हिसकावून दूर फेकल्याचे ३८ वर्षीय महिला साक्षीदाराने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. बी. पठाण यांच्यासमोर साक्ष नोंदवताना सांगितले. त्या वेळी तिने आणि तत्कालीन रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलशी संबंधित घटनांचा क्रमही न्यायालयाला सांगितला.
घटनेच्या दिवशी ती तिच्या दोन मुलांसह प्रवास करत होती. पहाटे ५:३० च्या सुमारास तिने पोलिसांच्या गणवेशातील पुरुष रेल्वेच्या डब्यात शिरताना पाहिला. आपल्याकडे राफयल रोखून ‘जर तुम्हाला या देशात राहायचे असेल, तर जय माता दी’ म्हणा, असे हिंदीत सांगितले. रायफलीच्या धाकासमोर आपण त्याची आज्ञा पाळली. तथापि, आरोपीने तिला मोठ्याने पुन्हा बोलण्यास सांगितले नाहीतर तिला गोळ्या घालण्याची धमकी दिली.
महिलेने तिच्याकडे वळवलेली रायफल पकडली. कॉन्स्टेबलने तिला रायफलला सोडण्याचा इशारा दिला. नाहीतर तो तिच्यावर गोळी झाडेल, असेही सांगितले. घाबरून बंदूक सोडल्यानंतर तो निघून गेल्याचे तिने शेवटी सांगितले.
---
सरकारी वकिलांचा दुजाेरा
सरकारी वकिलांनीही महिलेच्या साक्षीला दुजोरा देताना आरोपीने तिला बुरखा घातल्यामुळे लक्ष्य केल्याचे नमूद केले. या वेळी महिलेने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झालेल्या चौधरीला ओळखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.