घोडबंदरच्या कोंडीवर ‘अवजड’ उतारा
घोडबंदरच्या कोंडीवर ‘अवजड’ उतारा
रात्री बारानंतर ट्रक, कंटेनर वाहतूक; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीला उतारा म्हणून आता अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांनी दिले आहेत. घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत येथील अवजड वाहनांची वाहतूक रात्रीच्या सत्रात म्हणजे रात्री १२ नंतर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास घोडबंदर मार्गावर सकाळ- संध्याकाळ होणाऱ्या वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घोडबंदर मार्ग सध्या वाहतूक कोंडीमुळे गाजत आहे. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक मंदावत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत, तर येथील रहिवासीही मेटाकुटीला आले आहेत. याविरोधात नुकतेच रहिवाशांनी आंदोलन करून उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची विनंती केली. दरम्यान, सोमवारीही या मार्गावर कोंडी झाल्याचे दिसून आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रात्री उशिरा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे. त्यांची या त्रासातून मुक्तता करणे हे अतिशय महत्त्वाचे असून, घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिल्या. त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल, तर त्याचे नियोजन करण्यासही सांगितले. जेएनपीटीकडून घोडबंदर रस्त्यावर येणारी वाहने रात्री १२ नंतरच सोडण्याच्या सूचना जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिल्या. तसेच याबाबत नियोजन करण्याबाबत नवी मुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांना सांगितले. बैठकीला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि जस्टीस फॉर घोडबंदर रोडचे पंकज सिन्हा, गिरीष पाटील आणि अॅड. राधिका राणे आदी उपस्थित होते.
आच्छाड, चिंचोटी येथे थांबा
मिरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त निकीत कौशिक, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्याशीही यावेळी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. घोडबंदर मार्गावर दिवसा अवजड वाहतूक बंद करण्यासाठी अहमदाबादकडून घोडबंदर रोडकडे येणारी वाहने ही रात्री १२ वाजलेनंतर सोडण्यात यावी, अशा सूचना दिल्या. त्याबरोबर या जड वाहनांसाठी आच्छाड आणि चिंचोटी या ठिकाणी पार्किगची व्यवस्था करून जड वाहनांचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे समन्वयाची जबाबदारी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई पोलिस आयुक्त, पालघर जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक, मिरा-भाईंदर पोलिस आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना दिल्या. या सर्व यंत्रणाच्या समन्वयाची जबाबदारी शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांच्यावर सोपविली असून, यामध्ये वेळेचे बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
...........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.