आठ महिन्यात १७ हजारांना श्वानदंश

आठ महिन्यात १७ हजारांना श्वानदंश

Published on

आठ महिन्यांत १७ हजारांना श्वानदंश
दरदिवशी ५०हून अधिक नागरिक होतात शिकार

कल्याण, ता. १६ (बातमीदार) : महापालिका क्षेत्रात यंदाच्या वर्षी भटक्या श्वानांची दहशत कमालीची वाढली आहे. पालिकेकडे नोंद असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीत १७,५१२ नागरिकांचा श्वानांनी चावा घेतला आहे. म्हणजे सरासरी प्रतिदिन ७० नागरिकांचे लचके तोडले जात आहेत. शनिवारी (ता. १३) एकाच दिवशी तब्बल ६७ नागरिकांना चावा घेतल्यानंतर भटक्या श्वानांचा विषय कल्याण-डोंबिवलीत अग्रस्थानी आला आहे. आता याबाबत महापालिकेने गंभीर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्यामुळे विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीती आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हे प्रमाण अधिक वाढले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. काही भटके श्वान माणसाळलेले अथवा शांत प्रवृत्तीचे असून, काही श्वान हे उपद्रवी आणि हिंसक प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे ज्या श्वानांमुळे नागरिकांना धोका आहे, ज्या श्वानांनी अनेकांचा चावा घेतला आहे अशा श्वानांची रवानगी इतर ठिकाणी करावी, अशीही वेगळ्या पद्धतीची मागणी नागरिकांकडून वारंवार होत असते.

श्वानदंश झाल्यानंतर महापालिका रुग्णालयात त्वरित टीटी (टिटॅनस टॉक्सॉइड) आणि एआरव्ही (अँटीरेबीज व्हॅक्सिन) या दोन मुख्य लसी दिल्या जातात. टीटीची लस जखमेद्वारे शरीरात जाणाऱ्या टिटॅनस बॅक्टेरियापासून सुरक्षितता देते. तर रेबीज प्रतिबंधासाठी एआरव्ही लसीकरण सुरू केले जाते. श्वानदंशानंतर योग्य उपचार न घेतल्यास रेबीज व टिटॅनस दोन्ही संभाव्य जीवघेणे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उपचार अवश्य घेण्याचे आवाहन चिकित्सकांकडून केले जाते.

महापालिकेची उपाययोजना
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ॲनिमल बर्थ कंट्रोल म्हणजेच प्राणी जन्म नियंत्रणासाठी एक केंद्र असून, तेथे महिनाभरात हजारो भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात. यामुळे श्वानांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण राहते. तसेच श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरणही या केंद्रावर केले जाते. शस्त्रक्रिया व लसीकरण झाल्यानंतर श्वानांना पुन्हा नेऊन त्यांच्या परिसरात सोडले जाते, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवलीत उपद्रवी भटक्या श्वानांची संख्या चिंतेचा विषय असला तरी निर्बीजीकरण व लसीकरणामुळे भटक्या प्राण्यांच्या नियंत्रणावर परिणामकारक उपाययोजना होत असून, रेबीजसारख्या आजारापासून संरक्षण धोरण मजबूत होत असल्याचे दावेही केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com