उड्डाणपुलावरील भिंतींवर ‘वृक्षसंवर्धन’
कासा, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलाच्या भिंतींवर चार ते पाच फूट उंच झाडे आणि गवत उगवल्याचे चित्र दिसत आहे. या झाडांच्या मुळांमुळे काँक्रीटच्या भिंतींना तडे जाण्याची शक्यता असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
महामार्गावरील अनेक उड्डाणपुलांवर अनेक ठिकाणी झाडे उगवलेली दिसतात. या पुलांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदारांवर असली तरी, प्रत्यक्षात या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अन्य अनेक समस्या अधोरेखित केल्या आहेत. उड्डाणपुलांवरील विजेचे दिवे बऱ्याच वेळा बंद असतात, पुलाखाली अंधार असतो, तसेच पावसाळ्यात पाणी साठून चिखल तयार होतो. अशा परिस्थितीत पुलाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
प्रशासनाकडून निर्देश
महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंधक सुहास चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित दखल घेत ठेकेदाराला उड्डाणपुलाच्या भिंतींवर उगवलेली झाडे स्वच्छ करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
सध्या महामार्गावर अनेक गंभीर समस्या आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवर खड्डे आहेत, उड्डाणपुलांवरील पथदिवे बंद असतात. पुलाखाली पाणी व चिखल साचतो. आता तर भिंतींवर मोठमोठी झाडे उगवू लागली आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात झाला, तर जबाबदारी कोण घेणार?
- आशीष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता