महापालिका निवडणूकीच्या कामाला लागा

महापालिका निवडणूकीच्या कामाला लागा

Published on

महापालिकेत स्वबळाची चाचपणी
वाशीत शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.१६ : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात दिल्या. गरज पडल्यास महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी शिंदे गटातर्फे करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे सोमवारी वाशी येथे मार्गदर्शन मेळाव्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना केल्या. या मेळाव्याला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नाहटा, ठाणे लोकसभा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष सुशील यादव, बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील, शहर प्रमुख विजय माने तसेच ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी किशोर पाटकर यांनी सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करताना ‘२०१४ पासून आपण सोशल मीडियाची ताकद अनुभवली आहे. हे प्रत्येक घटकांशी जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्याचा प्रभावी वापर करून लोकांशी नाळ जोडा. तसेच घराघरांत जाऊन शिंदेंनी केलेल्या कामांची माहिती द्या. मनपा निवडणुकीत महायुतीच्या बळावर उतरण्याचा प्रयत्न आहे; मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील’, असे सांगितले. तर विजय नाहटा यांनी ‘सध्याची प्रभागरचना जवळपास अंतिम असून त्यात किरकोळ बदल होतील. त्यामुळे त्याच अनुषंगाने काम सुरू करा. प्रत्येक पॅनेलनुसार जबाबदाऱ्या वाटून घ्या. शिंदे घेतलेले पुनर्विकासाचे निर्णय आणि वाशी-ऐरोली टोलमाफी जनतेपर्यंत पोहोचवा, विजय आपलाच होईल’, असा दावा केला.
---------------------------
खासदार म्हस्केंचा कानमंत्र
नवी मुंबई मनावर महायुतीचा भगवा फडकवणे, हेच लक्ष्य असले पाहिजे. विरोधक सकाळपासून शिवसेनेवर टीका करत असतात. त्यांनी तोच वेळ नवी मुंबईच्या विकासासाठी दिला असता तर शहर आज नंदनवन झाले असते. मात्र, शिंदेंनी इतरांप्रमाणे घराण्याचा विचार न करता संपूर्ण नवी मुंबईच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून लोकांपर्यंत शिंदेंचे काम पोहोचवावे, असा कानमंत्र खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com