तिसऱ्या डोळ्याने वाहन चालकांना हेरले
तिसऱ्या डोळ्याने वाहनचालकांना हेरले
१४ दिवसांत वाहतुकीचा नियम मोडणारे ६,९३९, सर्वाधिक मोटारसायकल चालक
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांच्या छबी टिपण्यासाठी कॅडबरी नाक्यावर बसाविण्यात आलेले कॅमेरे वाहतूक नियंत्रण विभागाकडे तक्रारींचा पाऊस पाडू लागले आहेत. १४ दिवसांत त्यांनी या चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्या ६,९३९ जणांना टिपले असून, त्यांचे फोटो कारवाईसाठी वाहतूक विभागाकडे पाठवले आहेत. वाहतूक विभाग संबंधित चालकांकडून ६८ लाख ७१ हजार ४०० एवढा दंड वसूल करणार आहे. या ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त मोटारसायकल चालकांचा समावेश आहे.
ठाणे वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतूक विभागाकडून १४ मुख्य चौकांमध्ये आयटीएमएस तंत्रज्ञानाचे ३५० कॅमेरे लावले जाणार आहेत. हे स्वयंचलित कॅमेरे चौकांमध्ये वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनांचे फोटो काढून ते त्वरित वाहतूक नियंत्रण विभागाकडे पाठवणार आहेत. तेथे त्यांच्यावर दंड आकारून दंडाचे चलान संबंधित वाहनमालकाला पाठवले जाणार आहे. या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट ठाण्यातील कॅडबरी चौकात सोमवारी (ता. १) सुरू करण्यात आला असून, अवघ्या १४ दिवसांत येथे ६,९३९ जणांनी वाहतुकीचे नियम मोडले आहेत. त्या सर्वांना ऑनलाइन चलान पाठवण्यात आले असून, त्यांच्याकडून दंडवसुली सुरू कारण्यात आली आहे.
दंडाच्या एकूण रकमपैकी एक लाख ४९ हजार रुपये इतका दंड वाहतूक विभागाने वसूलदेखील केला आहे. उर्वरित दंडवसुलीदेखील केली जाणार असून, लवकरच ऑनलाइन दंड पाठवलेल्यांना फोनच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी वाहतूक विभागाकडून कॉल सेंटर सुरू केले जाईल, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, एकाच ठिकाणी अवघ्या १४ दिवसांत हजारोंच्या संख्येने वाहतुकीचे नियम मोडले जात असून, त्यांच्यावर कोट्यवधी लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई केली गेली आहे. अशाच प्रकारे आणखी १३ ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार असल्याने ही दंडाची कारवाई अब्जावधींच्या घरात जाणार असल्याचे दिसते.
कॅडबरी चौकात नियमभंग केलेली वाहने
ट्रिपल सीट - ११२, दंड - १०,१२,०००
विनाहेल्मेट - ३,१३४, दंड - ३१,३४,०००
जम्पिंग सिग्नल - ३,३३०, दंड - २४,२०,०००
स्टॉप लाईन क्रॉसिंग - २४३, दंड - १,३६,५००
फ्रंट सीटिंग - ११, दंड - १५,५००
सीटबेल्टशिवाय - ४९, दंड - ४९.०००
इतर - ६०, दंड - १,०४,०००
कॅडबरी चौकात आयटीएमएस तंत्रज्ञानाचे १२ कॅमेरे बसवले आहेत. त्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ही यंत्रणा येथे कार्यान्वित केल्याची माहिती मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे. शिवाय येथे जनजागृतीचे बॅनर लावले असून, शालेय विद्यार्थ्यांकडूनसुद्धा याची माहिती वाहनचालकांना देण्यात आली आहे. सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करायला हवे.
- पंकज शिरसाट, उप आयुक्त, वाहतूक विभाग