इंजिनीअरिंगच्या तब्बल ३६ हजार जागा रिक्त
इंजिनिअरिंगच्या ३६ हजार जागा रिक्त
एक शाखा वगळता सर्वत्र प्रवेश कमी
मुंबई, ता. १६ : राज्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीई आणि बी.टेकच्या पदवी प्रवेशासाठी मागील वर्षाच्या तुलनेत २२ हजार ७१३ जागा वाढवूनही ८२.१९ टक्के प्रवेश झाले. गेल्या वर्षी ८२.७४ प्रवेश झाले होते. मॅन्युफॅक्चर अँड मटेरिअल इंजिनिअरिंग या एकाच शाखेत १०० टक्के प्रवेशाचा अपवाद वगळता सर्वच शाखांमध्ये प्रवेश कमी झाले आहेत. इंजिनिअरिंगच्या तब्बल ३६ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड सायबर सेक्युरिटी आणि डाटा सायन्ससारख्या शाखांतील प्रवेश मागील वर्षाच्या तुलनेत ४ ते १४ टक्क्यांनी घटले आहेत. दुसरीकडे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रवेशात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच मेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलक्ट्रिकल इंजिनिअरिंग आदी शाखांच्या प्रवेशात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात बीई, बी.टेकच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत चार फेऱ्यांमध्ये प्रवेश झाले. त्यात एक लाख ३० हजार ८३५ जणांनी प्रवेश निश्चित केले, तर ए कॅपमध्ये २३ हजार ४६ आणि व्यवस्थापन कोट्यातून १२ हजार ८६५ जणांचे प्रवेश झाले. यंदा उपलब्ध असलेल्या दोन लाख दोन हजार ६८३ जागांसाठी दोन लाख २५ हजार १६६ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख ६६ हजार ७४० जणांचे प्रवेश पूर्ण झाले, तर उर्वरित ३६ हजार १६८ जागा रिक्त राहिल्या. विशेष म्हणजे यंदा ईडब्ल्यूएससाठी १० टक्के राखीव जागा असूनही प्रवेश कमी झाले, तर दुसरीकडे पहिल्यांदाच यंदा मुलींची संख्या दोन टक्क्यांहून अधिक वाढली असली तरी संस्था स्तरावर घेण्यात आलेल्या फेरीत यंदा खूप प्रवेश कमी झाल्याची माहिती सीईटी सेलने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आली आहे.
...
या शाखांना पसंती
मागील वर्षांच्या तुलनेत सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिरिअरिंग, मेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलक्ट्रिकल इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिक प्रवेश घेतले. दुसरीकडे आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड सायबर सेक्युरिटी आणि डाटा सायन्ससारख्या शाखांना मागील वर्षी अधिक पसंती असतानाही यंदा त्यांचे प्रवेश कमी झाल्याचेही दिसून आले.
...
सर्वांत कमी प्रवेश
फूड इंजिनिअरिंगसाठी केवळ १३.४३ टक्के असे सर्वांत कमी प्रवेश झाले. त्याखालोखाल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (कोलॅब्रेशन अँड ट्विनिंग प्रोग्राम) या शाखेत १६.१३ टक्के इतकेच प्रवेश झाले. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग (कोलॅब्रेशन अँड ट्विनिंग प्रोग्राम)साठी १९.३५ टक्के, सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंगसाठी २०.९० टक्के सिव्हिल इंजिनिअरिंग (कोलॅब्रेशन अँड ट्विनिंग प्रोग्राम)साठी २२.५८ टक्के, तर इलेक्ट्रानिक्स ॲड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे २९.३ टक्के प्रवेश झाले.
...
विभागानिहाय प्रवेश (२०२५-२६)
विभाग - एकूण जागा - झालेले प्रवेश - मुले - मुली
अमरावती - १०,४७० - ९,१५७ - ५,०५२ - ४,१०५
औरंगाबाद - १७,२२९ - ११,२९९ - ७,१६४ - ४,१३५
मुंबई - ३९,३६३ - ३१,९३० - २१,९१७ - १०,०१३
नागपूर - २३,५६५ - २०,९८७ - १२,१४६ - ८,८४०
नाशिक - २९,३७८ - २३,१२२ - १४,२०० - ८,९२२
पुणे - ८२,८७८ - ७०,२५१ - ४४,०७१ - २६,१८०
एकूण - २,०२,८८३ - १,६६,७४६ - १,०४,५५० - ६२,१९५
...
टक्केवारी २०२५-२६
एकूण - ८२.१९ मुले ६२.७० मुली ३७.३०
टक्केवारी २०२४-२५
एकूण ८२.७४ मुले ६४.६१ मुली ३५.३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.