मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या जागेसाठी रस्सीखेच!
मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या जागेसाठी रस्सीखेच!
भाजप म्हणते गोल्फ करा, ठाकरे गटाकडून रुग्णालयाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई महापालिकेने सात वर्षांपूर्वी बंद केलेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडसाठी आता रस्सीखेच सुरू झाली आहे. सुमारे २४ एकर एवढा मोठा हा भूखंड असून, त्यापैकी सुमारे १५ एकर जागेवर गोल्फ कोर्स करावे, असे भाजपा म्हणत आहे, तर कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. याशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कास्टिंग यार्ड आणि आरएमसी प्लांट लावण्यासाठी द्यावा, अशीही मागणी डीआरपीने पालिकेकडे केली आहे. त्यामुळे प्रशस्त भूखंडाच्या वापराबाबत सुरू असलेली रस्सीखेच कोण जिंकणार, सरकार कोणाची मागणी मान्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई शहरासह उपनगरांत दररोज गोळा केला जाणारा कचरा टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने १९६७ साली मुलुंड डम्पिंग ग्राउंड सुरू केले होते. मात्र त्या ठिकाणी सुमारे २५-२८ मीटर उंचीचे कचऱ्याचे ढीग तयार झाले असून, त्याची क्षमता संपल्याने पालिकेने २०१८ पासून ते बंद केले आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या या जमिनीच्या वापरासाठी वेगवेगळ्या मागण्या नोंदवल्या जात आहेत.
कोण काय म्हणते?
भाजप ः भाजपाचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी येथील रहिवाशांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी डम्पिंग ग्राउंडच्या १५ एकर जागेवर भव्य गोल्फ कोर्स तयार करावे, अशी मागणी आहे. त्यामुळे मुलुंडकरांना हक्काची जागा उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेना ठाकरे गट
पूर्व उपनगरांत मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे केईएम, शीव, नायर आणि जे. जे. या रुग्णालयांवर मोठा ताण येतो. तसेच येथील रहिवाशांचीही मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय किंवा डोळ्यांचे रुग्णालय उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हे रुग्णालय पीपीपी तत्त्वावर उभारावे, असेही त्यांनी सुचविले आहे.
डीआरपी
सध्या धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि एनएमडीपीएलच्या माध्यमातून धारावीचा पुनर्विकास केला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक असलेले कास्टिंग यार्ड आणि आरएमसी प्लांट आदी बाबी उभारणे आवश्यक आहेत. त्यासाठी जागा मिळावी, यासाठी डीआरपीने मुंबई महापालिकेला पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.