एल्‍फिन्स्‍टन पूल तोडकामाने ‘रुग्‍णकोंडी’

एल्‍फिन्स्‍टन पूल तोडकामाने ‘रुग्‍णकोंडी’

Published on

एल्‍फिन्स्‍टन पूल तोडकामाने ‘रुग्‍णकोंडी’
रुग्णालय गाठण्यासाठी ३० ते ३५ मिनिटांचा उशीर; नियोजनाचा अभाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल बंद होऊन पाच दिवस झाले आहेत. पुलाचे पाडकाम सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागत आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसतोय. कोंडीमुळे रुग्णवाहिकेला रुग्णालय गाठण्यासाठीचा सरासरी वेळ वाढला आहे.
परळ भागात केईएम, टाटा मेमोरीयल, वाडीया व ग्लेईगल्स आदी रुग्णांची मोठी वर्दळ असणारी रुग्णालये आहेत. ही सर्व रुग्णालये कमी अंतरावर आहेत. अनेक वेळा आपत्‍कालीन परिस्थितीतील रुग्ण या रुग्णालयात येतात. जलद गतीने पोहोचण्यासाठी एल्फिन्स्टन पूल अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र अटल सेतूला जोडणारा उन्नत पूल बांधण्यासाठी एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू झाले. त्यामुळे रुग्णवाहिकांना काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी आता वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. परळला येण्यासाठी टिळक ब्रिज, करी रोड या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. या ठिकाणी होणाऱ्या कोंडीमुळे १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी ३० ते ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. परिणामी, अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले की, मी स्वत: त्या पुलावरून प्रवास करून रुग्णालयात यायचो. आता करी रोडवरून मला यावे लागते. सायन पूल बंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आता थोडीशी गैरसोय सहन करावी लागेल, मात्र भविष्यात त्याचा उपयोग होईल. आपात्कालीन रुग्णांना त्याचा त्रास होतोय, मात्र अशावेळी रुग्णवाहिकांनी वेगळा मार्ग घेऊन रुग्णालयात पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.

ठोस उपाययोजनांचा अभाव
पूल बंद झाल्यानंतर प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापनाचे व्यवस्‍थित नियोजन केले नसल्याचा आरोप रुग्णवाहिका सेवेतील चालकांनी केला आहे. इतर वाहतुकीचे ठीक आहे, मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी कोणताही पर्यायी किंवा इतर ठोस उपापयोजना करण्यात आली नसल्याचा आरोप वाहनचालकांचा आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकते, असा धोकाही त्यांनी वक्त केला आहे. दुसरीकडे एमएमआरडीएने पूल बंद केल्यासंदर्भातील कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे आम्हाला उपापयोजना करता आल्या नसल्याचा आरोपही केईएम रुग्णालयासह इतर रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

आमच्या रुग्णवाहिका आम्ही प्रभादेवी भागात महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केल्या आहेत. आम्ही रुग्‍णांपर्यंत लवकर पोहोचतो, मात्र रुग्णालय गाठण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ लागत आहे.
डॉ. मंजित बरसगडे,
जिल्हा व्यवस्थापक, मुंबई, १०८ रुग्णवाहिका

पूल बंद झाल्यामुळे दादर टीटी ते लालबाग असा वाढीव प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास म्हणजे रुग्णांच्या जीवितासोबत खेळण्यासारखा आहे. या रुग्णवाहिकांना वाहतूक पोलिसांकडून विशेष सवलत किंवा त्यांच्यासाठी नियोजन करणे अपेक्षित होते.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते

आम्ही ही परिस्थिती गृहीत धरली होती. पुलाचे काम आता दोन वर्षे तरी चालेल, मात्र भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या संपेल, हे मात्र सांगता येत नाही.
- डॉ. बिपीन चिवले,
मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लेनईगल्स रुग्णालय

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करावे लागतात. त्याचा विचार केला नाही. त्यामुळे रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. याला सर्वस्वी एमएमआरडीए प्रशासन कारणीभूत आहे.
- सचिन पडवळ, माजी नगरसेवक, शिवसेना (ठाकरे गट)

हा पूल बंद झाल्यामुळे रुग्ण आणि रुग्णवाहिकांचे हाल होत आहेत. तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्‍णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा किंवा रुग्णवाहिकेसाठी गरज भासल्यास ग्रीन कॉरीडॉर तयार करून द्यावा.
- रामचंद्र कदम, अध्यक्ष, रुग्ण मदत कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com