अरुंद रस्त्यावर जुन्या वाहनांचा बाजार

अरुंद रस्त्यावर जुन्या वाहनांचा बाजार

Published on

अरुंद रस्त्यावर जुन्या वाहनांचा बाजार
कल्याण-शिळ रोडच्या कडेला विक्री; कोंडीची समस्या

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण-शिळ रोडवर मेट्रो १२चे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील मुख्य दोन मार्गिका (लेन) बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच कमी पडत असून, दररोज येथे तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येबरोबरच आता जुन्या वाहनांची बेकायदा विक्री आणि रस्त्यालगत पार्किंगची भर पडत आहे. रस्त्याच्या कडेलाच येथील गॅरेजचालक, दुकानदारांकडे जुनी वाहने विक्रीसाठी उभी केली जात आहेत. या वाहनांच्या पार्किंगमुळे येथील मार्ग हा अधिक चिंचोळा होत असून, त्याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही.

कल्याण-शिळ रोडच्या कडेला असलेल्या अनेक गॅरेजचालक व वाहनांचे पार्ट विकणाऱ्या दुकानदारांनी जुनी वाहने विक्रीसाठी रस्त्यावरच उभी केली आहेत. अनेकदा ही वाहने त्या भागातील अपूर्ण लेन किंवा कच्च्या रस्त्यावर पार्क केलेली असतात. त्यामुळे गोळवली गावापासून ते काटई नाक्यापर्यंत अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. या वाहनांमुळे रस्ता आणखी अरुंद होतो आणि याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. काही खासगी वाहनधारकही आपली वाहने रस्त्यालगतच पार्क करीत असल्याने समस्या अधिक तीव्र होते.

फुटपाथ तसेच रस्त्याचा काही भाग दुकानदारांकडून अतिक्रमित करण्यात आला आहे. काही गॅरेजचालक रस्त्यावरच दुरुस्तीची कामे करतात. त्यामुळे चालत जाणाऱ्यांसाठी जागा राहत नाही. बेकायदा गॅरेज उभारणाऱ्यांविरोधात यापूर्वी पालिकेकडून कारवाई झाली असली तरी त्यामध्ये सातत्याचा अभाव असल्याने अशा गॅरेजचालकांचे फावते आहे.

वाहतूक पोलिसांचे अपुरे बळ
वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी अपुरे मनुष्यबळ आणि वाढते अडथळे यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाईची तीव्रता आणि सातत्य दिसून येत नाही.

मार्गदर्शक उपाययोजना
कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना आवश्यक आहेत.
रस्त्यावर व कडेला उभ्या केलेल्या जुन्या वाहनांवर तत्काळ कारवाई व्हावी.
फुटपाथ व रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणाचे निर्मूलन करावे.
गॅरेज व दुकानदारांवर सातत्याने कारवाई करून बेकायदा वाहने उभी करू नयेत याची खबरदारी घ्यावी.
कच्च्या रस्त्यांचे तात्पुरते काम पूर्ण करून मार्ग सुलभ करणे.
मेट्रो १२चे काम सणासुदीच्या काळात थांबवण्याचा पर्याय विचारात घेणे.
एमएमआरडीए, एमएसआरडीसी, केडीएमसी, वाहतूक पोलिस यांच्यात समन्वय साधून एकत्रित कृती आराखडा तयार करणे

मार्ग खडतर
कल्याण-शिळ रोड हा ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे; मात्र सध्या रस्त्याचे अपूर्ण काम, मेट्रो प्रकल्प, रस्त्यावर बेकायदा गॅरेज व वाहने यामुळे हा मार्ग खडतर झाला आहे. प्रशासनाने योग्य ती पावले उचलली तर हा मार्ग पुन्हा सुटसुटीत व वाहतूक सुलभ करणारा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com