एकमेकांना विश्वासात घेऊन सहकाराचा रथ पुढे नेऊया

एकमेकांना विश्वासात घेऊन सहकाराचा रथ पुढे नेऊया

Published on

एकमेकांना विश्वासात घेऊन सहकाराचा रथ पुढे नेऊया ः दरेकर
मुंबई, ता. १७ : एकत्रितपणे सहकारातील पैसा सहकारात आला पाहिजे. सर्व व्यवसाय सहकारात केले तर सुगीचा तो दिवस दूर नाही. एकमेकांना विश्वासात घेऊन सहकारचा हा रथ पुढे नेऊया, असे आवाहन मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे केले.
मंगळवारी झालेल्या मुंबई जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, आमदार व संचालक प्रसाद लाड, संचालक प्रकाश दरेकर, नंदकुमार काटकर, नितीन बनकर, विठ्ठल भोसले, विष्णू घुमरे, संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी, आनंदराव गोळे, जिजाबा पवार, संचालिका कविता देशमुख, जयश्री पांचाळ, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
या वेळी दरेकर म्हणाले की, आज सहकाराला दिशा, उर्जितावस्था देण्याची गरज आहे. राज्य संघाचा अध्यक्षपदावरून राज्यातील सहकाराच्या अडचणी काय आहेत, शिक्षण-प्रशिक्षणाच्या अडचणी काय आहेत, संस्था अडचणीत का आहेत, त्यांना ताकद देण्यासाठी सरकार दरबारी काय केले पाहिजे, यावर नियोजन केले. येणाऱ्या काळात या सर्व संकल्पना राबवून सहकाराची, महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा पुन्हा आणण्यासाठी आता मुंबईकर पुढाकार घेतील.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत होती, पण आता आपण मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला मार्गदर्शन करण्याची वेळ आली आहे.

बँकिंग, पतसंस्‍थांचे वर्चस्‍व
मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर आपल्या बँकिंग, पतसंस्थांचे वर्चस्व राहिले पाहिजे. खासगी बँका येतात आणि या देशाच्या आर्थिक राजधानीत व्यवसाय करतात. आपण आपले स्वतःचे स्थान भक्कम व्हावे व मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरही सहकाराचा पगडा असायला हवा. तसेच राज्यात प्रतिकूल परिस्थितीत १५ हजार कोटींचा टप्पा पूर्ण करणाऱ्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनुकरण सर्वांनी करायला हवे, असे मत दरेकर यांनी मांडले.

Marathi News Esakal
www.esakal.com