वासुंद्री रोडवर कचऱ्याचा थर
वासुंद्री रोडवर कचऱ्याचा थर
जनावरांच्या जीवाशी खेळ; नागरिक संतप्त, प्रशासन गप्प
टिटवाळा, ता. १७ (वार्ताहर) : मांडा-टिटवाळा येथील वासुंद्री रोडवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे परिसरात अस्वच्छतेसह गंभीर आरोग्यविषयक संकट निर्माण झाले आहे. कचऱ्यावर गुरे-ढोरे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कुजलेल्या अन्नपदार्थांवर उपाशीपोटी तुटून पडताना दिसत असून, हे चित्र जनावरांच्या जीवाशी खेळणारे आहे. तसेच कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या कडेला दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने, गुरे-ढोरे प्लॅस्टिकसह अन्न शोधून खात आहेत. पशुवैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, प्लॅस्टिक हे न पचणारे असून, ते जनावरांच्या पचनसंस्थेत अडकण्याचा धोका असतो. तसेच त्यांना अंतर्गत दुखापती होऊन गंभीर आजार व मृत्यू ओढावण्याची भीती असते. कचऱ्यातून अन्न शोधणारी ही निरपराध जनावरे आपल्या डोळ्यांसमोर मृत्यूच्या दिशेने ढकलली जात आहेत, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मानवी आरोग्यालाही धोका
कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, माशा आणि इतर कीटकांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. डेंगी, मलेरिया, कॉलरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव या भागात होत असल्याने, नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात कुजणारा कचरा आणि चिखलामुळे या रस्त्यांवरून पायी चालणेही कठीण झाले आहे.
“केवळ करवसुली, बाकी दुर्लक्ष”
स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.“रोज या रस्त्याने शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक जातात. दुर्गंधीमुळे जगणेही कठीण झाले आहे. नगरपालिका केवळ कर वसूल करण्यात व्यस्त आहे, पण नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे,” असा रोष नागरिकांनी व्यक्त केला.
उपाययोजनांची मागणी
स्थानिक नागरिक मिलिंद भाटकर, दीपक उबाळे तसेच चामुंडा शॉपचे मालक तोलाराम यांनी तातडीने वासुंद्री रोडवर स्वच्छता मोहीम राबवण्याची, तसेच जनावरांना प्लॅस्टिकपासून वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे प्रशासनाला चेतावणी दिली की, जर वेळेवर पावले उचलली गेली नाहीत, तर नागरिकांचा संयम सुटू शकतो.