भिवंडीकरांना हवा अधिकृत बाजार
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १७ : भिवंडी महापालिका क्षेत्रात काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरसीसी रस्त्यांच्या कामामुळे वाहनचालकांना खाचखळग्यांपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र रस्तारुंदीकरणानंतर भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांनी रस्ते अडवून दादागिरी सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
महापालिकेने १९७०च्या दशकात प्रभूआळी येथे महात्मा फुले मार्केट बांधले होते. हेच शहरातील पहिले आणि शेवटचे भाजीपाला बाजार ठरला. काही महिन्यांपूर्वी या इमारतीला धोकादायक घोषित करून जमीनदोस्त करण्यात आले. नवीन बाजारपेठेची तजवीज न करता इमारत पाडल्यामुळे नागरिकांना चार दशकांपासूनच्या समस्या अधिकच गंभीर बनल्या आहेत. ठेकेदार राज आणि स्थानिक राजकारणामुळे दोन पिढ्यांना शहरातील विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान काही दोन-तीन चांगले अधिकारी आले; पण ते स्थानिक राजकारणाचे बळी ठरले.
भिवंडी नगरपालिका असताना शहरातील पद्मानगर येथे मार्केटसाठी आरक्षित जागेवर भाजीपाला मार्केट बांधले. धामणकरनाका-पद्मानगर भागात असलेल्या रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना या मार्केटमध्ये स्थलांतरित करण्यात पालिका आणि लोकप्रतिनिधींना अपयश आले. महापालिका झाल्यानंतर नझराना चित्रपटगृहासमोरील नाल्यावर नवीन मार्केट उभारले. हे मार्केट अनधिकृत असल्याचे काही वर्षांनी जाहीर झाले. त्यामुळे शिवाजीनगर आणि ठाणगे आळी येथील वाहतुकीच्या रस्त्यावरील मार्केट स्थलांतरित झाले नाही. पालिकेने ठेकेदारांना त्यांची बिले दिली असता, कोणीही तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हरकत घेतली नाही. पालिकेचे नियोजन केवळ कागदावर असल्याने सध्या शहारातील विविध ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला आणि मासळी बाजार सुरू आहेत.
अतिक्रमणावर कारवाई आवश्यक
भाजीपाला मार्केटमध्ये विक्रेत्यांनी रस्त्यावर कब्जा केल्याने वाहतुकीचे रस्ते अरुंद झाले आहे. शिवाजीनगरमधून तानाजीनगर-नाविचाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने येथून चारचाकी दूरच दुचाकीही चालविणे कठीण झाले आहे. वाहनचालकांनी भाजीवाल्याशी वाद केला असता विक्रेते एकत्रित अंगावर धावून येतात. त्यामुळे रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी स्वीकारून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर असलेले अतिक्रमण दूर करावे. वेळ पडल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे. रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यासाठी १ ते ५ प्रभागांचे प्रभाग अधिकारी अतिक्रमणविरोधी मोहिमेत सक्रिय नसल्यामुळे अतिक्रमण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या तक्रारींमुळे नगरविकास अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली असली, तरी दररोज गस्त घालून रस्ते मोकळे करावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
-------
महापालिकेचे अधिकृत भाजीपाला बाजार नसल्याने भाजीविक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. नागरिकांना वाहतुकीला अडथळा होऊ नये, म्हणून काही ठिकाणी सीमा ठरवून दिली आहे, तरीही विक्रेते रस्त्यावर अडथळे निर्माण करत आहेत. त्यांच्यावर शहर विकास विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. यामुळे ते दुखावले जात असले, तरी नागरिकांच्या हितासाठी कारवाई सुरू राहील.
- अरविंद घुगरे, नगर विकास अधिकारी, भिवंडी महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.