कोंडी, खड्ड्यांच्या समस्येमुळे कामावर परिणाम

कोंडी, खड्ड्यांच्या समस्येमुळे कामावर परिणाम
Published on

विरार, ता. १७ (बातमीदार) : वसई-विरार परिसरातील हजारो प्रवासी घोडबंदर मार्गासह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करत असतात, मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांना कोंडीचे ग्रहण लागल्याने नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. त्याचा परिणाम कामावर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नाेकरदारवर्ग, चालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर-ठाणे हा मार्ग वसई, विरार, नालासोपारा, मिरा रोड, भाईंदर या पश्चिम उपनगरांना ठाणे, नवी मुंबई व पुढील परिसराशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे, मात्र सध्या अपुऱ्या पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थापनामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वसई-विरारहून ठाणे व नवी मुंबई (तुर्भेपर्यंत) येथे दररोज सुमारे तीन हजार ते साडेतीन हजार नागरिक नोकरीसाठी प्रवास करतात. राष्ट्रीय महामार्ग-४८ व घोडबंदर रोडवर दररोज पाच ते सहा तास वाहतूक कोंडी नियमित झाली असून, फाउंटन हॉटेल, गायमुख घाट व काशी मिरा जंक्शन परिसरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, असमतल रस्ता व अपूर्ण दुरुस्तीमुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

नायगाव उड्डाणपुलाचे काम विलंबाने होत असल्याने नागरिकांचा त्रास अधिक वाढला आहे. अनेकदा सिमेंट व अवजड ट्रक विरुद्ध दिशेने धोकादायकरित्या येतात. प्रवासातील विलंबामुळे अनेक कंपन्या वसई-विरार येथील तरुणांना नोकरी देण्यास नाखूश आहेत. तसेच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकांना पाठीचे, मणक्याचे आणि श्वसनाचे विकार वाढू लागले आहेत. कोंडी आणि प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदन प्रवासी संघटनेने आमदार स्नेहा दुबे-पंडित यांना दिले आहे.

या समस्येवरील उपाय
- कोंडीच्या वेळेमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलिस तैनात करणे.
- विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे.
- घोडबंदर रोड, गायमुख घाट व महामार्गावरील खड्डे तातडीने भरणे व पुनर्बांधणी करणे.
- सुरू असलेल्या कामादरम्यान योग्य फलक, अडथळे व जनतेला माहिती देणे.
- नायगाव उड्डाणपूल व इतर प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करणे.
- वसई जेट्टी ते ठाणे जेट्टी व पुढे ऐरोलीपर्यंत रो-रो सेवा सुरू करणे.
- वसई-विरार ते पनवेल, दिवादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे.

दररोजच्या कोंडीमुळे मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जात आहोत. मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासारख्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. वेळेत कार्यालयात पोहोचता न आल्यामुळे अनेकांचा नोकरीवर परिणाम होत असून, कंपन्यादेखील वसई-विरार येथील उमेदवारांना कमी प्राधान्य देत आहेत. फाउंटन-गायमुख घाट परिसरातील ही गंभीर परिस्थिती तातडीने दूर होणे, हीच मागणी आहे.
- प्रसाद लेमॉस, प्रवासी, गिरीज

वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पाठदुखी आणि मणका विकार यात वाढ झाली आहे. हे आजार गंभीर स्वरुपात पुढे येत आहेत. आपत्कालीन स्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवेतही अडथळा येत आहे. काही दिवसांपूर्वी वेळेवर वैद्यकीय उपचारासाठी सफाळ्यातील एक महिला पोहोचू न शकल्याने तिचा मृत्यू झाला होता. तासनतास कोंडीत अडकल्याने धुराचा त्रास आणि प्रदूषण वाढल्याने दमा आणि श्वसनाचे आजारही बळावत आहेत.
- डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष, नालासोपारा मेडिकल असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com